Mon, May 20, 2019 10:04होमपेज › Ahamadnagar › कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्रे करून द्यावीत

कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्रे करून द्यावीत

Published On: Mar 12 2018 1:03AM | Last Updated: Mar 11 2018 10:42PMपारनेर : प्रतिनिधी    

राज्याच्या 33 जिल्ह्यांतील 252 तालुक्यांमधील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या सर्व समित्या तीन वर्षांपूर्वीच बरखास्त करण्यात आल्या असून, पुन्हा नव्याने आंदोलनात सहभागी होण्यासाठी विविध तालुक्यांमधील  कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र करून देण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पत्रकाद्वारे केले. 

हजारे यांनी या पत्रकात म्हटले आहे की, 1997 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत माहितीचा अधिकार, ग्रामसभेस जादा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कयदा, जनतेची सनद यांसारखे जनहिताचे, राज्य हिताचे कायदे करण्यास सरकारला जनशक्‍तीचा दबाव निर्माण करून भाग पाडले. त्या कायद्यांचा जनतेला लाभ होत आहे. या कायद्यांबरोबरच पतसंस्था, वाळूउपसा, दारूबंदी यासारखे सामाजिक विषय घेऊन व्यवस्था बदलाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. पतसंस्थेतील गरीब सामान्य महिलांच्या ठेवी मिळाव्यात, म्हणून सरकारला दोनशे कोटी रुपये देण्यास भाग पाडले. सहकाराचा कायदा करण्यास भाग पाडण्यात आले. सरकार आज कॅशलेसवर बोलत आहे. मात्र आम्ही गेल्या तीस वर्षांपासून त्याचे अनुकरण करीत आहोत. म्हणूनच खोडसाळपणे केलेले आरोप, प्रत्यारोप कितीही झाले, तरी त्याचा प्रभाव संस्थेच्या कामावर पडला नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार्‍या अशा संस्था चालविणार्‍या कार्यकर्त्यांना चारित्र जपावे लागते. नेहमी सामाजिक, राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवून कार्य करणे आवष्यक असते. 

महाराष्ट्राचे दौरे करून संघटन उभे केले. मात्र आंदोलनातील काही कार्यकर्ते गैरव्यवहार करतात, अशा बातम्या आल्याने राज्याच्या 33 जिल्ह्यांच्या 252 तालुक्यांतील संघटन तीन वर्षांपूर्वी बरखास्त करून आता चारित्र्यावर आधारलेल्या कार्यकर्त्यांचे संघटन उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र करून देणार्‍या कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, मी पक्ष अथवा पार्टीमध्ये जाणार नाही. मी समाज, राज्य, राष्ट्राची सेवा करील. माझे चारित्र शुद्ध ठेवील. काही भ्रष्टाचाराचे पुरावे हाताशी आले, तर सर्व पुरावे एकत्र करून सरकारकडे चौकशीचा आग्रह धरणे, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणे, राज्यात आणि देशात एकाच वेळी अशा कार्यकर्त्यांनी आंदोलने उभी झाली, तर सरकारला निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा जावे लागेल, हा उद्देश आहे. अर्थात प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष ठेवण्याचे काम करावे. ऐवढे केले तरी सुद्धा भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर आळा बसून, होणार्‍या कामांचा दर्जा सुधारेल. दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जातो. ते घडणार नाही, अशा इतर गैरव्यवहारांना आळा घालता येऊ शकेल, असा विश्‍वास हजारे यांनी व्यक्‍त केला आहे.