Thu, May 23, 2019 04:29होमपेज › Ahamadnagar › संघाशी संबंध जोडून बदनामीचा प्रयत्न

संघाशी संबंध जोडून बदनामीचा प्रयत्न

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 11:35PMपारनेर : प्रतिनिधी

कल्पना इनामदार या नथूराम गोडसे यांच्या नात असल्याचा व त्यांच्या हाती आंदोलनाची सर्व सूत्रे सोपविल्याच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या बातम्यांचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी इन्कार केला आहे. आपणास व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनास बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून, त्याविरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याचे अण्णा हजारे यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे जाहीर केले. 

हजारे यांनी म्हटले आहे की, वास्तविक पाहता कल्पना इनामदार आणि माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलन सुरू होणार म्हणून विविध राज्यांतील जे नवीन कार्यकर्ते पुढे आले, त्यात कल्पना इनामदार यांचा समावेश होता. त्यांच्याकडे आंदोलनाची कोणतीही सूत्रे सोपवली  नव्हती. 

समन्वय समितीमधील प्रत्येक कार्यकर्त्याने आंदोलनाची कामे विभागून घेतली होती. त्यानुसार इनामदार यांच्याकडे मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी होती. या आंदोलनाची सर्व सूत्रे आपण स्वतः हाताळीत होतो. मात्र, आंदोलनास बदनाम करण्याच्या हेतूने इनामदार यांचे नाव नथुनाम गोडसेंशी जोडले गेले. इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून आपला संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. खोटे किती बोलावे, याचे भानही बदनामी करणार्‍या चौकडीला राहिले नसल्याचा टोला हजारे यांनी या लगावला आहे. 

आंदोलनापूर्वी अण्णा हे संघाचे कार्यकर्ते असल्याचा लेख प्रसिद्ध करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर काही मंडळींनी जाणीवपूर्वक त्यावर चर्चा करून त्यात भर घातली. माजी मंत्री नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना अण्णांनी संघाच्या शाखेत दहा वर्षे प्रशिक्षण घेऊन, त्यानंतर सामाजिक काम सुरू केल्याचा खोटा आरोप केला. अशा पद्धतीने विशिष्ट वर्गाकडून आपले नाव संघाशी जोडण्याचा प्रयत्न करून, जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याबदल हजारे यांनी खेद व्यक्‍त केला आहे. 

आपण कोणतीही व्यक्‍ती, पक्ष किंवा पार्टी समोर ठेऊन आंदोलन करीत नसलो, तरी अशा लोकांना आमचे आंदोलन कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा बाजूने सुरू असल्याचा भास होतो. आमच्या आंदोलनामुळे राज्यातील प्रमुख पक्ष व पार्ट्यांच्या मंत्र्यांना ते भ्रष्ट ठरल्यामुळे घरी जावे लागले. त्यात विविध पक्षांची मोठी हानी झालेली आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळेच अलिकडच्या काळात राजकीय पक्षांमधील दुखावलेल्या काही लोकांनी आपल्या बदनामीची मोहीम हाती घेतल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. 
 
खटाशी खट, उद्धटाशी उद्धट ! 

आपणास बदनामीची फिकीर वाटत नाही. मी मंदिरात राहणारा एक फकीर माणूस आहे. अशा प्रकारच्या बदनामीमुळे माझे काही नुकसान होणार नाही. परंतु, समाजाचे नक्‍कीच मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. सातत्याने होणारी बदनामी किंवा अपमान पचविल्यामुळे जर समाजाचे, राज्याचे व देशाचे नुकसान होणार असेल, तर असा अपमान पचविणे दोष ठरेल, अशी आपली धारणा आहे. म्हणून संतांनी म्हटल्याप्रमाणे खटाशी खट, धटाशी धट व उद्धटाशी उद्धट झालेच  पाहिजे, असेही हजारे यांनी म्हटले आहे.