Wed, Mar 27, 2019 05:59



होमपेज › Ahamadnagar › कर्जमाफी म्हणजे, ‘लबाडाघरचं जेवणाचं अवताण’: पवार

कर्जमाफी म्हणजे, ‘लबाडाघरचं जेवणाचं अवताण’: पवार

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:34AM



पारनेर : प्रतिनिधी      

बड्या धनिकांनी कर्ज थकविल्याने बँकांना झालेला तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकार 88 हजार कोटींची तरतूद करीत आहे. तर दुसरीकडे शेतकर्‍यांकडील कर्ज वसुलीसाठी त्याची भांडीकुंडी रस्त्यावर आणत, त्यांच्या अब्रुचे धिंडवडे काढले जात आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांबाबत सत्ताधार्‍यांच्या नीती व नियतीमध्ये खोट असल्याचे दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

पारनेरचे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या जन्मगावी वासुंदे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजीमंत्री मधुकर पिचड, यशवंतराव गडाख, दादा कळमकर, आ. अरूण जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील व तालुक्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

पवार पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दूर करून त्याला स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी आम्ही 72 हजार कोटींची कर्जमाफी दिली. मात्र, 56 हजार कोटींची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात मात्र काही ना काही कारणे देऊन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली. फडणवीस सरकार कर्जमाफीच्या बाबतील शेतकर्‍यांना उपाशी ठेवायला निघाले असून, त्यांची कर्जमाफीची घोषणा म्हणजे लबाडाघरचं जेवणाचं आवताण असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला. 

आपण कृषीमंत्री असताना तांदळाच्या बाबतीत भारत हा प्रथम क्रमांकाचा निर्यातदार देश होता. गहू व साखरेच्या बाबतील देशाचा दुसरा क्रमांक होता. आता मात्र स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवजी मका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे असेच सुरू राहिले तर लवकरच लोकांवर ‘मिलो’ खाण्याची वेळ येईल. ‘तुम्ही मका खा किंवा हुलगे, देश बदलतो आहे, देशाचा चेहरा बदलतो आहे’, असे जगाला सांगितले जात आहे. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार यांच्याविषयी काहीही देणेघेणे नसणारा हा वर्ग असून, या वर्गाच्या हातची सत्ता काढून माणूसकी जपणार्‍या, तुमचे आमचे प्रश्‍न सोडविणार्‍यांच्या हाती सत्ता देण्याची आता वेळ आली असल्याचे ते म्हणाले. 

डंगरे झालो नाही !

गडाख, पिचड व माझे वय 75 च्या पुढे गेले असले तरी, आम्ही डंगरे झालेलो नाहीत. तुम्ही काळजी करू नका. कोणताही नांगर असो पल्टीचा असो वा सुल्टीचा, आमचा बैल तासाला धरूनच चालणार. कारण शिवळे धरून दुसरीकडे पाहण्याची आमची सवय नाही. आमचं सगळं लक्ष तासावरच असतं. एकदा जमिनीत नांगराचा फाळ घातला की ती नांगरट नीटच  झाली पाहिजे व त्यातून सोन्यासारखे पीक आले पाहिजे. गावचा संसार बदलला पाहिजे, एवढी एकच गोष्ट आम्हा वडिलधार्‍यांच्या डोक्यात असल्याचे पवार म्हणाले.

सुजितला पाठबळ द्या

दुष्काळी पारनेर तालुक्याचा चेहरा बदलण्यासाठी स्व. वसंतराव झावरे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाविषयी जनतेच्या मनामध्ये आस्था आहे. नव्या पिढीला शक्ती देऊन नवे नेतृत्त्व मोठे करायचे आहे. त्यांच्यामार्फत तुमच्या हिताची जपवणूक करायची आहे. त्यासाठी आता सुजित झावरे व त्यांच्या सहकार्‍यांना जनतेने ताकद आणि पाठबळ द्यावे, असे आवाहन पवार यांनी केले.