होमपेज › Ahamadnagar › बांधकामासाठी शाळांची निवड रखडली

बांधकामासाठी शाळांची निवड रखडली

Published On: Jul 28 2018 1:31AM | Last Updated: Jul 27 2018 10:47PMनगर : प्रतिनिधी

शिर्डीच्या साईबाबा संस्थानने तब्बल 30 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिलेला होता. त्यापैकी 10 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला देण्यास राज्य सरकारने मान्यता देऊन एक महिना झाला तरीही शाळांची निवड करण्यात आलेली नाही. साईबाबा संस्थानच्या दुर्लक्षामुळे जवळपास 140 शाळांच्या बांधकामाला आडकाठी आली आहे.

शिर्डी संस्थानने मंजूर केलेल्या 10 कोटींच्या निधीतून अंदाजे 140 नवीन शाळा खोल्या होऊ शकतील. राज्य शासनाच्या मान्यतेअभावी हा प्रस्ताव अडगळीत पडला होता. याबाबत पुढारीने सातत्याने बाजू मांडली होती. त्यानंतर गेल्या महिन्याच्या 26 तारखेला शासनाने 10 कोटींच्या निधीला मंजुरी दिली.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मागील वर्षी नगर तालुक्यातल्या निंबोडी येथील शाळेची इमारत कोसळून अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला तर, शिक्षिकेसह अनेक विद्यार्थीही जखमी झाले. ही घटना झाल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळांच्या भिंती कोसळणे, छत कोसळणे, पत्रे उडून जाणे अशा गंभीर प्रकारच्या घटना घडल्या. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून, अनेक ठिकाणी धोकादायक इमारतीत शाळा भरत असल्याचे दिसते.

अध्यक्षा शालिनी विखे यांनी निंबोडी घटना झाल्यानंतर जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळांचा आढावा घेतला. मोडकळीस आलेल्या, दुरुस्ती करता येण्याजोग्या व नवीन बांधावयाच्या अशा शाळांची माहिती मागविली. त्यानुसार जवळपास तेराशे शाळा खोल्या बांधण्याची गरज असल्याचे लक्षात आले. जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याने विखे व उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली. शिक्षणमंत्र्यांचीही भेट घेतली.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. शिर्डी संस्थानने जिल्हा परिषदेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शाळा खोल्यांच्या बांधकामांसाठी 30 कोटी रुपयांचा निधी देण्याचे मंजूर केले. याबाबतचा प्रस्ताव संस्थानने राज्य सरकारकडे पाठविला होता. एकूण 500 खोल्यांसाठी 36 कोटींच्या निधीची गरज आहे. शिर्डी संस्थानला जिल्हा परिषदेने 1 हजार 92 शाळा खोल्यांची यादी दिली आहे. या यादीत निर्लेखनाला मंजुरी दिलेल्या शाळा खोल्या, विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था केलेल्या शाळा, पटसंख्या वाढलेल्या शाळा अशा क्रमाने तालुकानिहाय यादी देण्यात आली आहे.

असे होणार शाळांचे बांधकाम

साईबाबा संस्थान मार्फत हा निधी जिल्हा परीक्षेस देण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शाळांचे बांधकाम राज्य सरकारच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग करावा लागेल. यादीतील शाळांची निवड श्री साईबाबा संस्थानच्या स्थानिक समितीमार्फत करण्यात येणार आहे.

सदस्यांनी लावली फिल्डिंग

शिर्डी संस्थानवर भाजपचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधार्‍यांसह विरोधी सदस्यांनीही आपापल्या गटात शाळा खोल्यांना मंजुरी मिळण्यासाठी शिर्डी संस्थानकडे फिल्डिंग लावली आहे. शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांना संपर्क साधत शाळा खोल्यांची मागणी केली जात आहे.