Sat, Jul 20, 2019 15:41होमपेज › Ahamadnagar › ज्ञान मंदिरात रंगली मांसाहारी पार्टी

ज्ञान मंदिरात रंगली मांसाहारी पार्टी

Published On: Jun 21 2018 1:29AM | Last Updated: Jun 20 2018 11:15PMदेवदैठण : प्रतिनिधी

शाळा म्हणजे आधुनिक ज्ञान मंदिरे. येथे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवितात. त्यामुळे त्यांचे पावित्र्य मोठे. मात्र याच ज्ञान मंदिरात तरुणांची सामिष पार्टी करून त्याचे पावित्र्य भंग केले आहे. हा प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शाळेत घडल्याने पालकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

श्रीगोंदा तालुक्याच्या पश्चिम टोकाला असणार्‍या देवदैठण जि. प. प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीत शंभराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेताहेत. सात-आठ फूट उंचीची संरक्षक भिंत असणार्‍या शाळेच्या मोठ्या आवारात झाडांची गर्दी, सांस्कृतिक कला मंच, मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, अशा प्रसन्न वातावरणात ज्ञानदानाचे पवित्र कार्य चालते. शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वाराला कुलूप असते.

त्यामुळे संध्याकाळी 5 वाजल्यानंतर व सकाळी साडेदहा वाजेपर्यंत शाळेत कुणीही नसते. दिवसभर गुणवत्तापूर्ण पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य चालत असलेल्या शाळेत मात्र रात्री गावातील युवक मटणाच्या पार्ट्या करण्यात रंगलेले दिसत आहेत. मंगळवारी (दि. 19) रात्री गावातील बारा ते पंधरा तरुण कुणाचीही परवानगी न घेता प्रवेशद्वारावरुन शाळेच्या आत गेले. जेथे शाळेतील लहानगी मुले प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी सांस्कृतिक कार्यक्रम वा आपली कला सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवतात, त्या कला मंचावरील भिंतीवर विद्येची देवता असणार्‍या सरस्वतीच्या चित्रा समोरच मटण व बिर्याणीवर ताव मारतात. शिवाय चोर तर चोर वर शिरजोर या म्हणी प्रमाणे आपल्या चाललेल्या मांसाहारी पार्टीचे सेल्फी व सर्वांचे एकत्र जेवतानाचे छायाचित्र काढून अगदी बेडरपणे ते व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप वरही पाठविले आहेत. 

हे फोटो अनेक ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पालकांतून या प्रकाबाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. ज्ञानदान करण्यात येणार्‍या शाळेतच असे अवैध प्रकार सुरू असल्याने भविष्यात विद्यार्थ्यांसमोर कुठला आदर्श ठेवायचा, असा सवाल त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी करून, संबंधित तरुणांवर कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून यापुढे कुणी असे करण्यास धजावणार नाही. 

संबंधितांना समज देणार ः मुख्याध्यापिका

शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वाराला कुलूप असतानाही उंच संरक्षक भिंतीहून वा प्रवेशद्वारावरून शाळेच्या आवारात परवानगी न घेता प्रवेश करणे वा पार्टी करणे, हे चुकीचे कृत्य आहे. त्यामुळे संबंधित तरुणांना शाळेत बोलावून त्यांना कडक शब्दात समज देणार असल्याचे मुख्याध्यापिका मंदा कौठाळे यांनी सांगितले. 

सदर प्रकार निंदनिय ः वाखारे

आजच्या तरुणांनी खरे तर लहान विद्यार्थ्यांसमोर आदर्शवत वागणे गरजेचे आहे. मात्र ज्ञान मंदिरात मांसाहारी पार्टी करणे हे कृत्य निंदनीय असून, संबंधित तरुणांनी चूक मान्य करुन ती पुन्हा होणार नाही, याची दखल घ्यावी, अन्यथा अशा गैर कृत्य करणार्‍यांवर गुन्हा नोंदविला जाईल, असा इशारा जि. प. सदस्या कोमल महेंद्र वाखारे यांनी दिला.