Thu, Jun 27, 2019 01:49होमपेज › Ahamadnagar › वीजबिलाबाबत मंत्र्यांची भेट घेऊ

वीजबिलाबाबत मंत्र्यांची भेट घेऊ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शेवगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील विविध प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे अडचणीत आल्या आहेत. या थकबाकीचा निर्णय शासन स्तरावर होणार असून, त्याकरिता ऊर्जामंत्र्यांबरोबर बैठक घेण्यात येईल. शेवगाव नगरपरिषद व पंचायत समितीच्या घरकुलाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्याची तसेच जे अधिकारी बैठकीस गैरहजर आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आ. मोनिका राजळे यांनी दिला. 

शेवगाव तालुक्याची टंचाई आढावा बैठक काल (दि. 2) पंचायत समिती  सभागृहात झाली. त्यावेळी आ. राजळे बोलत होत्या. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. बंकट आर्ले, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, सरचिटणीस भीमराज सागडे, सुनील रासने, वाय. डी. कोल्हे, महिला आघाडी अध्यक्ष कमलताई खेडकर, गणेश कराड आदींसह विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आ. राजळे म्हणाल्या, नगरपरिषदेत पंतप्रधान आवास योजनेत घरकुलासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी नेमलेली संस्था नियमबाह्य पद्धतीने 500 रुपये शुल्क वसूल करीत आहे. त्याबाबत बैठकीत वादळी चर्चा झाली. ही योजना चांगली असून, नागरिकांच्या मनातील शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे. म्हणून परिषदेचे मुख्याधिकारी व तहसीलदारांनी याबाबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच या बैठकीस गैरहजर राहिल्याने मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांच्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करा, अशी सूचना तहसीलदारांना केली.

बैठकीत सर्वाधिक तक्रारी महावितरण बाबतीत होत्या. तक्रारींचा ओघ पाहून महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र साळुंके यांनी तक्रारी लगेच मार्गी लावण्याचे आश्वासने दिले. त्याची दाखल घेत आ. राजळे यांनी महावितरणची स्वतंत्र बैठक लावून या आश्वासनांची काय पूर्तता होते, याची खातरजमा केली जाईल अशी तंबी दिली. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनी तून शेतीला पाणी दिले जाते, अशी तक्रार गादेवाडी येथील ग्रामस्थांनी केली.  

त्यावर 22 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली असल्याची माहिती शाखा अभियंता अनिल सानप यांनी दिली. दिंडेवाडी येथही असाच प्रकार होत असल्याची तक्रार  करण्यात आली.आव्हाने व बालमटाकळी येथे घरकुला विषयी मोठ्या तक्रारी झाल्या. जोहरापूर येथे मुख्य वाहिनीवरून देण्यात आलेले नळजोड व प्राथमिक शाळांच्या खोल्या खासगी संस्थेला दिल्याची तक्रार गंगा खेडकर व रवींद्र उगलमुगले यांनी केली. पाण्याचे उद्भव असलेल्या सार्वजनिक ठिकाणावरून अवैधरीत्या पाणी उपसा झाल्यास संबधितावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा तहसीलदार पाटील यांनी दिला.


  •