Thu, Apr 25, 2019 13:48होमपेज › Ahamadnagar › वरिष्ठांच्या जाचामुळे ‘सावित्री’आयसीयूत..!

वरिष्ठांच्या जाचामुळे ‘सावित्री’आयसीयूत..!

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 10:51PMराहुरी ः प्रतिनिधी

संपूर्ण देशभरात आज महिलांचा सन्मान केला जात असताना काही ठिकाणी मात्र शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही आद्य शिक्षिका समजल्या जाणार्‍या ‘सावित्री’ला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे संतापजनक चित्र आहे. राहुरीतील वरीष्ठ अधिकार्‍याने मानसिक त्रास दिल्याने एका शिक्षिकेचा रक्तदाब वाढून त्या अत्यावस्थ झाल्या. नगर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. दरम्यान, संबंधित शिक्षिकेच्या मुलाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आयसीयुतील छायाचित्र व त्याखाली बरे-वाईट झाल्यास ‘तो’ वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहील, अशी पोस्ट केल्याने दिवसभर चर्चेला उधाण आले होते. 

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण, महिला सन्मानाचे आठवड्यापासून सर्वच क्षेत्रांतून धडे गिरवले जात आहेत. यात शैक्षणिक विभागही कुठे मागे नाही. मात्र ,खरचं महिलांचा सन्मान होतो का ? याविषयी राहुरीतील घटनेतून प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागात शिकवणार्‍या त्या शिक्षिकेने पुढे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदातून सर्वाधिक डीजिटल शाळा व आयएसओ शाळा असलेले केंद्र निर्माण करून आदर्श उभा केला. वार्षिक स्नेहसंमेलनाची मुहूर्तमेढही याच महिला शिक्षिकेने रोवली.  या ‘सावित्री’ने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणताना, इतर महिला शिक्षिका व शिक्षकांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍याकडून नेहमीच वेगवेगळी कारणे दाखवून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने संबंधित शिक्षिका त्रस्त होत्या. त्यातच शिक्षण समितीची माहिती वेळेत मिळाली नाही, म्हणून वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना कारवाईची नोटीस बजावली. त्यामुळे अचानक त्या शिक्षिकेचा रक्तदाब वाढून घबराट उडाली. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ राहुरी येथील एका हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, डॉक्टरांनी नगरला हलविण्याच्या सल्ला दिल्याने त्यांना तातडीने नगरला नेले. काल त्यांच्यावर नगर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू होते. त्यांच्या मुलाने उपचार घेतानाचे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट करताना संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याच्या त्रासामुळेच ही वेळ आली. जर आईचे काही बरे-वाईट झाले, तर संबंधित वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहील, असे त्याखाली नमूद करीत या प्रकरणाचा वाचा फोडली.  दरम्यान, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला शिक्षिकेबाबत ही घटना घटल्याने राग व्यक्त होत आहे.