होमपेज › Ahamadnagar › सातपुतेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सातपुतेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 10:21PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्यातील फरार आरोपी रोहिदास सातपुते याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने काल (दि. 20) फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांच्यासमोर दोन तास युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यातील फरार आरोपी सातपुते याचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी न्या. पाटील यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. आरोपीचे वकील अ‍ॅड. सपकाळ म्हणाले की, सातपुते याच्याकडे विद्युत विभागासह इतरही अतिरिक्त पदभार होते. या घोटाळ्यात सातपुते याचा सहभाग नाही. जामीन मंजूर झाल्यावर तो पोलिसांना तपासात सहकार्य करील. त्यामुळे सातपुते याला अटकपूर्व जामीन मंजूर करावा.

सरकारी वकील अ‍ॅड. स्नेहा गौर म्हणाल्या की, फरार रोहिदास सातपुते हा या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आहे. वादग्रस्त कामांच्या मूळ फायली सातपुते याच्या ताब्यात असल्याचा जबाब अटकेतील आरोपीने दिलेला आहे. सातपुते याला अटक केल्यानंतर गुन्ह्याचा व्यवस्थित तपास करता येईल. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. 

सुमारे दोन तास यावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी सातपुते याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी तपासी अधिकारी सुरेश सपकाळे हेही उपस्थित होते.