Sun, Jul 21, 2019 09:49होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यातील ३१ गावांत येणार महिलाराज

जिल्ह्यातील ३१ गावांत येणार महिलाराज

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 27 2018 12:08AMनगर : प्रतिनिधी

जिल्हाभरातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, या गावांत राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.  सरपंचपदाची  निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने, या निवडणुका अधिकच चुरशीच्या  होणार आहेत. जवळपास 31 गावांतील सरपंचपद हे महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने, या गावांत महिलांमध्येच लढत होणार आहे. 

ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 26 सप्टेंबरमध्ये होणार आहेत. त्यानुसार या निवडणुकीची नोटीस आज (दि.27) प्रसिध्द केली जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे  निवडणुकीसाठी  इच्छुक असणारे कार्यकर्ते खडबडून जागे झाले आहेत. सरपंचपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव, नगर तालुक्यातील बुरुडगाव, पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर आदींसह जवळपास 31 गावांतील सरपंचपद हे महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे येथील पुरुषांची राजकीय मक्तेदारी मोडून निघाली आहे. या गावांतील राजकीय प्रतिष्ठित व्यक्तींना आता कारभारणींनाच निवडणुकीला उभे करावे लागणार आहे. त्यानुसार त्यांची मोर्चेबांधणी देखील सुरु झाली आहे. 

नेवासा तालुक्यातील घोडेगाव, राहुरी तालुक्यातील मुसळवाडी, श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी, पाथर्डी तालुक्यातील करंजी आदींसह  16 ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव आहे. त्यामुळे या गावांत इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे. त्यामुळे  सरपंचपदाची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. 

टाकळीमिया ग्रामपंचायतीसाठी सदस्य संख्या 17 आहे. सरपंचपद हे अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी  राखीव आहे. या गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1 हजार 20 एवढी आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या देखील अधिक असणार आहे. नगर तालुक्यातील बुरुडगावात सदस्यपदाच्या अकरा जागा असून, सरपंचपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे येथील निवडणूक देखील चुरशीचीच होणार आहे.

17 गावांतील सरपंचपद ‘सर्वसाधारण’

राहुरी तालुक्यातील मुसळवाडी, मालुंजे खुर्द, चिखलठाण, श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी, कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव, जामखेड तालुक्यातील धनेगाव, नेवासा तालुक्यातील घोडेगाव, जैनपूर, खामगाव, राजेगाव, वडुले, पाथर्डी तालुक्यातील अंबिकानगर, करंजी, हात्राळ, शंकरवाडी, सैदापूर, शेवगाव तालुक्यातील एरंडगाव भागवत आदी सतरा ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार आहे.