Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Ahamadnagar › घरपट्टी थकविल्याने जिल्हाधिकार्‍यांची कारवाई; आता कोण, याकडे लक्ष

सरपंच, उपसरपंच अपात्र 

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 24 2018 10:17PMकर्जत : प्रतिनिधी 
घरपट्टी थकविल्याने कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील सरपंच मंदा रामदास  धुमाळ व उपसरपंच मच्छिंद्र ज्ञानदेव गायकवाड यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील बेनवडी ग्रामपंचायतीचे सरंपच मंदा धुमाळ व उपसरपंच मच्छिंद्र गायकवाड यांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी थकवली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य गणेश रामदास गदादे, दीपाली संतोष गदादे व छाया बबन गदादे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रार अर्जावरून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सरपंच धुमाळ व उपसरपंच गायकवाड यांना अपात्र ठरविले आहे.  
तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे की, सरपंच धुमाळ यांचे बेनवडी गावात घरे आहेत. घर क्रमांक 754 व 863 या घरांची  सन 2016-17 व सन 2017-18 या कालावधीतील  घरपट्टी रक्कम अनुक्रमे 581 व 559, असे एकूण 1 हजार 140 रुपये थकवली आहेत. उपसरपंच गायकवाड यांचेही गावात दोन घरे आहेत.  घर क्रमांक 101 व 594 या दोन्ही घरांची 371 व 354, अशी 725 रुपये घरपट्टी थकविली आहे. ही रक्कम वेळेत भरावी, यासाठी ग्रामसेवक रामा चंदू धनवडे यांनी सरपंच व उपसरपंचांकडे वारंवार मागणी केली. मात्र त्यांनी पदाचा गैरवापर करून ही रक्कम थकविली. 
ग्रामपंचायत आधिनियम कलम 14 खंड (ह) प्रमाणे कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याकडे ग्रामपंचायत कराची थकबाकी असल्यास व थकबाकी बिल दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत तिचा भरणा न केल्यास त्याचे सदस्यपद अपात्र ठरते. याच प्रमाणे सरपंच धुमाळ व उपसरपंच गायकवाड हे दोघे सदस्य राहण्यास अपात्र ठरल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे. या अर्जावर सुनावणी होऊन या दोघांना अपात्र ठरविण्याचा निकाल 21 मे रोजी जिल्हाधिकार्‍यांनी दिला. 
सरपंच धुमाळ व उपसरपंच गायकवाड यांचे पद रद्द झाल्याने या ग्रुप ग्रामपंचायतीत खळबळ उडाली असून, नवीन सरपंच व उपसरपंच कोण होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.