Fri, Jul 19, 2019 19:58होमपेज › Ahamadnagar › सरपंच, ग्रामसेवकाला शिवीगाळ

सरपंच, ग्रामसेवकाला शिवीगाळ

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 14 2018 10:20PMनगर : प्रतिनिधी

सारोळा कासारच्या सरपंच आरती रवींद्र कडूस, ग्रामसेवक टी. के. जाधव व इतरांना ग्रामपंचायत सदस्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सारोळा कासार ग्रामपंचायतीला  मिळालेल्या निधीतून काळेमळा जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी(दि. 13) सकाळी  सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. कार्यक्रम सुरु असताना ग्रा.प.सदस्य नामदेव काळे तेथे आला.

‘तुम्ही कोणाला विचारून काम सुरु केले. मी काम होवू देणार नाही’, असे म्हणत ठेकेदाराला दमबाजी करून काम बंद पाडले. सरपंच कडूस यांनी काळे यास समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अरेरावी करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तेथे उपस्थित ग्रामसेवक व इतर ग्रा. पं. सदस्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत काम बंद पाडले.

याप्रकरणी सरपंचआरती कडूस यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य नामदेव काळे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.