होमपेज › Ahamadnagar › संत वामनभाऊ दिंडीचा रंगला रिंगण सोहळा

संत वामनभाऊ दिंडीचा रंगला रिंगण सोहळा

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 14 2018 10:26PMजामखेड : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथील संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पहिले रिंगण जमादारवाडी जामखेड येथील वामनभाऊ गड येथे काल (दि.14) दुपारी रंगले. यावेळी परिसरातील भाविक रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता.  
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधीपती हभप महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.12) श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. गहिनीनाथगड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, वनवेवाडी, मातकुळी, केकाणवस्ती असा प्रवास करत काल सकाळी दिंडीचे जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे आगमन झाले. जामखेड शहरात प्रवेश करताच तपनेश्वर भजनी मंडळाने सामोरे जाऊन दिंडीचे स्वागत केले. यावेळी राजू गोरे, कुंडल राळेभात, सुंदर काका देशमुख, मोहन पवार, बंडू डांगरे, दादा गोरे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. नंतर शहरातील विठ्ठल मंदिर व जगदाळेवस्ती येथे महाप्रसाद घेऊन संत वामनभाऊ मंदिर येथे  दुपारी ही दिंडी पोहचली.
संत वामनभाऊ महाराज मंदिरासमोर प्रांगणात रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, वीणेकरी, टाळ-मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, गहिनीनाथ महाराज की जय, सद‍्गुरू वामनभाऊ महाराज की जय, असा  जय जयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतील अश्‍व धाऊ लागले. या अश्वांनी परिसरातून आलेल्या भाविकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. यावेळी भाविकांनी एकच जय जयकार केला. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या तालावर टाळकर्‍यांनी ठेका पाऊले खेळत मनसोक्त आनंद घेतला.
यावेळी आष्टीचे आ. भीमराव धोंडे, मधुकर राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण, विजय बागडे, दादासाहेब महाराज सातपुते, बाळकृष्ण महाराज राऊत, हरिभाऊ आजबे व संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या भागातून पंढरपूरला जाणारी ही सर्वांत मोठी दिंडी आहे. चार वर्षांपासून दिंडीचे येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. या दिंडीला मोठे महत्व आहे. राज्यभरातून सुमारे 25 हजारांहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली.