Mon, Mar 25, 2019 17:29होमपेज › Ahamadnagar › दुहेरी हत्याकांडापासून ते दोषारोपपत्रापर्यंत!

दुहेरी हत्याकांडापासून ते दोषारोपपत्रापर्यंत!

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 10:52PMनगर : प्रतिनिधी

मनपा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केडगावात संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघा शिवसैनिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर अनेक ‘हायप्रोफाईल’ नेत्यांची नावे गुन्ह्यात आली. विशेष तपास पथकावर आरोप झाल्यानंतर सीआयडीकडे तपास देण्यात आला. शिवसैनिकांच्या कुटुंबीयांनी उपोषण केले. चार पोलिसांवर ठपका ठेऊन त्यांना बडतर्फ करण्यात आले. काल (दि. 6) दोषारोपपत्र दाखल झाले. अशा घटनाक्रमानंतर आता पुरवणी दोषारोपपत्रात कोणाची नावे येणार? याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे सीआयडीच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

केडगाव पोटनिवडणुकीच्या निकालानंतर 7 एप्रिल रोजी सायंकाळी शिवसेनेच्या संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. हत्या करतांना पिस्तुलासह धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. खुनानंतर काही तासांतच मारेकरी संदीप गुंजाळ हा पारनेर पोलिस ठाण्यात शरण आला होता. 8 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप,  भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांच्यासह 30 जणांविरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर (वय 25) याने ही फिर्याद दिली होती.आ. संग्रामज जगताप यांना चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणल्याचे कळल्यानंतर समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घालून त्यांना पळवून नेले होते. आ. संग्राम जगताप यांना 8 एप्रिल रोजीच अटक करण्यात आली होती. हत्याकांडानंतर शिवसैनिकांच्या झालेल्या उद्रेकात केडगाव भागात मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. याप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह 600 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल आहे. आ. जगताप यांना पळवून नेल्याप्रकरणी 9 एप्रिल रोजी भिंगार कॅम्प पोलिसांनी आ. शिवाजी कर्डीले यांना अटक केली.

9 एप्रिल रोजी विशेष तपास पथक (एसआयटी) ची स्थापना करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणात अटक असलेल्या कैलास गिरवले यांचा उपचारादरम्यान 16 एप्रिल रोजी मृत्यू झाला. विशेष तपास पथकावर विविध आरोप झाल्यानंतर 17 एप्रिल रोजी हत्याकांडाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला.7 एप्रिल रोजी आरोपी संदीप गुंजाळ व 19 एप्रिल रोजी हत्याकांडातील आरोपी रवी खोल्लम याला अटक करण्यात आली. तपासात माहिती देण्यास कुणी पुढे येत नसल्याचे पाहून पोलिसांनी 20 एप्रिल रोजी हत्याकांडाची माहिती देणार्‍यास एक लाखांचे बक्षीस जाहीर केले. हत्याकांड हे नगरसेवक विशाल कोतकर याच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप होता. परंतु हत्याकांडानंतर जवळपास 16 दिवस विशाल कोतकर पसार होता. 23 एप्रिल रोजी विशाल कोतकरला अटक करण्यास पोलिसांना यश आले.

हत्याकांडातील कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या चार पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये सुमित गवळी, अविनाश बर्डे, समीर सय्यद, रवी टकले यांचा समावेश आहे. 13 मे रोजी कोतकर व ठुबे कुटुंबीयांनी उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी उपोषण केले होते. भानुदास कोतकर याला 14 मे रोजी अटक करण्यात आली. 24 मे रोजी सीआयडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. सीआयडीकडे तपास आल्यानंतर 43 दिवसात हत्याकांडाचा तपास करत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

कार्यकर्त्यांची न्यायालयात गर्दी

केडगाव हत्याकांड प्रकरणात दोषारोपपत्र दाखल होणार असल्याने आ. जगताप, आ. कर्डीले व कोतकर समर्थकांनी न्यायालयात गर्दी केली होती. सकाळपासून कार्यकर्ते हजर होते. त्यामुळे सीआयडी पथकाने पत्रकारांशी बोलणेही टाळले. वाढलेली गर्दी पाहून सीआयडी पथकाने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातून विशेष बंदोबस्त बोलावून घेतला. अखेर पोलिसांच्या गराड्यात सीआयडी पथक रवाना झाले.