Sat, Jul 20, 2019 14:59होमपेज › Ahamadnagar › संगमनेर ते मुंबई गोमांस तस्करी!

संगमनेर ते मुंबई गोमांस तस्करी!

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 25 2018 11:57PMसंगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर पोलिसांनी कत्तलखान्यांना लक्ष्य केल्यानंतरही शहरातील मदिनानगर, रहेमतनगर, भारतनगर, जमजम कॉलनी या परिसरातून, तसेच कुरण गावातून मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहनातून मध्यरात्री मुंबईकडे तस्करी अद्यापि सुरुच आहे. त्यामुळे परिसरातील  कुरण रस्ता, माताडे मळा, गुंजाळ मळा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा चालू असतानाही संगमनेर शहरात मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून गोवंश आणि गोमांस तस्करी अद्यापि सुरूच असल्याचे संतापजनक चित्र आहे. 
शहरात गोवंशाची हत्या करून मोठ्या प्रमाणात गोमांस मुंबईला विक्रीसाठी जाते. तसेच गोवंशही कत्तलीसाठी मुंबईकडे पाठविल्या जातात. शहर पोलिसांच्या माध्यमातून सतत कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत अनेक कत्तलखानाधारकांवर कारवाई केली आहे. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा तेच लोक हा व्यवसाय चालू ठेवतात. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचा कोणताही धसका कत्तलखाने चालक व मालकांना राहिला नसल्यानेच संगमनेर गोमांसप्रकरणी कुप्रसिद्ध बनत चालले आहे.

शहरातील विविध भागांतून  तसेच कुरण गावातून गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांसांच्या गाड्या भरून  मध्यरात्री अडीच ते तीन वाजता कुरण रस्ता व गुंजाळ मळा परिसरातून सुकेवाडी, खांजापूर, मालदाडमार्गे जात असतात. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, संगमनेर पोलिसांनी गोमांसाबाबतची कारवाई अधिक तीव्र करून रात्रीची गस्तही वाढवावी व कुरण रस्ता परिसरातून गोमांस घेऊन जाणार्‍या तस्करांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.