Thu, Sep 20, 2018 14:44होमपेज › Ahamadnagar › दरोडेखोरांची टोळी केली जेरबंद

दरोडेखोरांची टोळी केली जेरबंद

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 30 2018 1:05AMसंगमनेर : प्रतिनिधी

अकोले रस्त्यावरील पुणे-नाशिक महामार्गाच्या बोगद्याजवळ काल पहाटे शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेली चार जणांची टोळी जेरबंद केली आहे. आरोपींकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे विविध हत्यारे व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.  सोमवारी (दि. 29) शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार दरोडेखोर दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शहरात काही ठिकाणी सापळे लावले होते. याच दरम्यान पहाटे 3.50 वाजेच्या सुमारास अकोले रस्त्यावरील पुणे-नाशिक महामार्गाच्या बोगद्याजवळ पोलिसांनी छापा टाकून अंधारात दडून बसलेल्या तिघांना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेत चौथा आरोपी पसार झाला होता मात्र काहीवेळातच पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याच्याही मुसक्या आवळल्या.

गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम, पो.कॉ.ईस्माईल शेख, आशिष आरवडे, सागर धुमाळ, विजय पवार आदींनी आरोपी निलेश राजेंद्र काथे (वय 21, रा. इंदिरानगर गल्ली क्र.3, संगमनेर),  धीरज राजेंद्र पावडे (वय 18, रा.वडारवस्ती, क्रीडा संकुलामागे, संगमनेर), प्रतिक अनुपम वाकचौरे (वय 23, रा. गोविंदनगर, संगमनेर), राजन दत्तात्रय हातकर (वय 26, रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर), यांच्याकडून मिरची पूड, कटावणी तसेच अन्य हत्यारे जप्त करण्यात आली. यावेळी स्प्लेंडर हस्तगत करण्यात आली.

पोलिस कारवाईत चार दरोडेखोर पकडल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात व पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांना देण्यात आली. माहिती मिळताच दोघेही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी पो.कॉ.गोरक्ष शेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक ए.बी.परदेशी हे करत आहेत.  दरम्यान, घटनेतील आरोपीबाबत पोलिस माहिती संकलित करीत असून अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकळ होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने दि. 2 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  काही दिवसांपूर्वीच संगमनेरात ऑईल चोरट्यांची टोळी पकडून याप्रकरणातील मोठे रॅकेट बाहेर आले होते. त्यानंतर आता दरोडेखोरांची टोळी जेरबंद केल्याने संगमनेरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसणार आहे.