Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रीय राजकारणात संगमनेरचा दबदबा

राष्ट्रीय राजकारणात संगमनेरचा दबदबा

Published On: Jul 22 2018 1:03AM | Last Updated: Jul 21 2018 11:56PMसंगमनेर : गोरक्ष नेहे

देशात व राज्यात मोदी लाट आल्यानंतर अनेक काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. मात्र, गेली 30 ते 35 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले व कोणतेच पक्षाचे पद नसतानाही पक्षाशी गद्दारी न करता एकनिष्ठपणाने काम केल्यामुळेच  माजी महसूल व कृषिमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी स्थान दिले. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात संगमनेरचा दबदबा वाढला आहे.

सहकारातील ज्येष्ठ नेते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी काँग्रेसची उमेदवारी घेऊन आमदारकी लढविली होती. त्यानंतर  एक पंचवार्षिक बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष लढविली आणि त्यानंतर त्यांनी आजतगायत काँग्रेस पक्षाकडून आमदारकीची निवडणूक लढविली आणि त्या सर्व निवडणुका जिंकल्या. मध्यंतरीच्या काळत काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी आता काय करायचे? असा विचार करत असताना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आ. बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसमधून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आपल्या वडिलांचा शब्द प्रमाण मानून ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले, ते आजपर्यंत. त्यामुळेच आतापर्यंत अनेक महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळण्याची त्यांना संधी मिळाली.

केंद्रात व राज्यात मोदी लाट आल्यानंतर काँग्रेसला देशात व राज्यात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची निवड झाली. ते विखे गटाच्या जवळचे असल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदी आ. थोरात यांचे पक्षातील कट्टर विरोधक असलेले राधाकृष्ण विखे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आ. थोरात यांना पक्षात कोणतेच पद नसल्यामुळे ते नाराज झाले. काही दिवसानंतर काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा राहुल गांधींवर आली. 

त्यात आ. थोरात यांच्यावर गुजरात विधानसभा प्रचार समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. आ. थोरात यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निवडून येतील असेच उमेदवार दिले. परंतु गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता मिळविता आली नसली तरी आ. थोरात यांनी प्रमाणिकपणाने पक्षाचे काम केल्यामुळे जागा वाढल्या हे मात्र तितकेच खरे आहे. त्यामुळे ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विश्वासास पात्र ठरले. त्यांचे पक्षश्रेष्ठीकडे वजन वाढल्यामुळे सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर काम करण्याची संधी दिली आहे. यात एकूण 51 सदस्य असून 23 जण कार्यकारिणीत, कायम निमंत्रितांमध्ये 18 तर विशेष निमंत्रितांमध्ये 10 जणांचा समावेश आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना महत्त्व राहणार आहे. काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवरील एक समिती तयार करून तिची कार्यकारिणी जाहीर केली. त्यात काँग्रेसचे दिगग्ज नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे या राज्यातील बड्या नेत्यांना डावलून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवर माजी महसूलमंत्री  थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

त्यात  महाराष्ट्रातून आ. थोरात यांच्याबरोबर रजनी पाटील आणि राजीव सातव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसची निर्णय घेणारी ही सर्वोच्च समिती आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत नव्या कार्यसमितीची बैठक 22 जुलैला होणार आहे. आ. बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा स्वच्छ असल्याने राहुल गांधींनी त्यांना पसंती दिल्यामुळे दिल्लीत संगमनेरचा नक्कीच दबदबा वाढला आहे.

राष्ट्रीय निवडीने राज्यातही संधी! 

राज्यातील दिग्गज नेत्यांना डावलून संगमनेरचे लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसशी कायम एकनिष्ठ  राहिलेले आ. बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महत्वाच्या असणार्‍या राष्ट्रीय  समितीवर कायम स्वरूपाचे निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक केली. याचा अर्थ आता आगामी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास राज्याचे नेतृत्व करण्याची संधी आ. थोरात यांच्याकडे चालून येऊ शकते अशी चर्चा राज्यात होत आहे.