होमपेज › Ahamadnagar › खून करुन मृतदेहाची विल्हेवाट

खून करुन मृतदेहाची विल्हेवाट

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 11:11PMसंगमनेर : प्रतिनिधी

चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तालुक्याच्या पठार भागातील डोळसने शिवारातील धुमाळवाडी शिवारात पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याचा मृतदेह पोलिसांच्या उपस्थित इन कॅमेरा उकरून काढण्यात आला. याप्रकरणी संशयावरून चाकण पोलिसांनी खून करणारा आरोपी भीमराव पवार (रा. धुमाळवाडी, ता. संगमनेर) याला अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खालुब्रे येथील व्यावसायिक बाळू जनार्धन नवले (वय 45,  कुरण, ता. जुन्नर)  हे दि. 24 जानेवारी रोजी कुरण येथे आपल्या मोटारसायकलवरून (एमएच. 14 डीवाय 270) निघाले होते. परंतु ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार चाकण पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी तपास करताना त्यांच्या मुलाने ते कुरण येथे जाणार असले तरी कुरणच्या नातेवाईकांकडे केलेल्या तपासानुसार तेथे पोहचलेच नसल्याचे समजले.

त्यामुळे चाकण पोलिसांनी त्यांच्या समवेत खड्डे खोदण्याचे काम करणार्‍या भीमराव पवार (रा. धुमाळवाडी, ता. संगमनेर) यांच्यावर संशय आला. पोलिसांना नवले याच्या मोबाईलचे  लोकेशनवरून दि. 25 जानेवारी रोजीचे शेवटचे लोकेशन संमगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोळसने शिवारातील धुमाळवाडी येथे असल्याचे ा समजले. पोलिसांनी त्यांच्या समवेत बिगारी काम करणार्‍या भीमराव मारुती पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मयत बाळू नवले व दुसर्‍या मोटारसायकलवरुन भीमराव पवार व त्याचा मित्र गणेश भैरव शिरतार असे तिघे साकूर येथे आले. त्यांनी तेथे मद्यपान करुन ते धुमाळवाडी येथे पवार यांच्या घरी गेले. त्याठिकाणी त्यांच्या झालेल्या किरकोळ वादातून  च़िडलेल्या भीमराव पवार याने नवलेच्या डोक्यात पाटा टाकून त्याला जागीच ठार केले.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी  पवार व त्याचा मित्र गणेश शिरतार यांनी त्याला गोधडीत गुंडाळले व धुमाळवाडी शिवारातील राहत्या घरापासून दीड किलोमिटर दूर जंगलात असलेल्या  ढोलदरा या ठिकाणी वनविभागाच्या दरीत वन क्षेत्राशेजारी पुरले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी नवले यांचा मोबाईल फोडून टाकला. त्यांची मोटारसायकल कोपरगाव येथे बेवारस अवस्थेत सोडून तो पुन्हा चाकणला निघून गेले. मिळालेली माहिती व पुराव्याच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन मृतदेह उकरुन काढला. चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शार्दुल देशमुख यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.

याप्रकरणी भीमराव पवार या आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी गणेश शिरतार हा फरार आहे. पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात पुढील तपास करीत आहेत. मोबाईल लोकेशनच्या आधारे चाकण व घारगाव पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश संपादन केले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते