Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Ahamadnagar › कारागृहातून संदीप पत्नीच्या संपर्कात!

कारागृहातून संदीप पत्नीच्या संपर्कात!

Published On: May 20 2018 1:40AM | Last Updated: May 19 2018 11:52PMनगर : गणेश शेंडगे

केडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकर याच्यानंतर आता माजी महापौर संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे. केडगाव हत्याकांडापूर्वी व त्यानंतरही सुवर्णा कोतकर या फक्त सासरे भानुदास कोतकरच नव्हे, तर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप कोतकर याच्याही संपर्कात होत्या, अशी माहिती पोलिस चौकशीतून निष्पन्न झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले. 

नगर पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळे फक्त संदीप कोतकरच नव्हे, तर नाशिक रोड कारागृह प्रशासनही अडचणीत येण्याची शक्यता आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या तपासातील बहुसंख्य बाबींवर जिल्हा पोलिस प्रशासनाने तपास केलेला आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेप व आरोप-प्रत्यारोपांमुळे तपासात अडचणी येत होत्या. केडगाव हत्याकांडात कोणत्या आरोपींचा सहभाग आहे. कोणाविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करता येऊ शकते, याचा तपास विशेष तपास पथकाने केलेला आहे. परंतु, राजकीय दबाव व इतर कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नामुळे अनेक बाबी उघड होऊनही उजेडात आणता आलेल्या नाहीत. त्या उजेडात आणलेल्या नसल्या, तरी रेकॉर्डवर आलेल्या आहेत. ‘एसआयटी’तील अधिकार्‍यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने रेकॉर्डवर बहुसंख्य गोष्टी आणलेल्या आहेत. रेकॉर्डवर आणलेल्या बाबींतून इतका पुरावा तयार झालेला आहे की  आता संबंधितांना फक्त अटक केली, तरी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावा तपास यंत्रणेकडे असेल.

पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानुसार खुनापूर्वी भानुदास कोतकर याचे सून सुवर्णा कोतकर हिच्यासोबत बोलणे झाले होते. मात्र, सासरेच नव्हे, तर पती संदीप कोतकर याच्याशी मोबाईलवरून संभाषण झाले होते. त्याला मोबाईल व सीमकार्ड कसे पुरविण्यात आले, हेही चौकशीतून पुढे आल्याचे समजते. परंतु, संदीप कोतकर हा कारागृहात असतानाच मोबाईल संभाषण झाल्याने तेथील अधिकारी व कर्मचारीही संशयाच्या फेर्‍यात अडकणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी ही बाब चव्हाट्यावर येऊ दिलेली नव्हती. हा प्रकार रेकॉर्डवर आलेला असल्याने संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य आता ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोतकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

तपास अजून जिल्हा पोलिसांकडेच!

राजकीय हस्तक्षेपाबाबत पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आलेला आहे. त्याबाबतचा आदेश प्राप्त झालेला आहे. मात्र, ‘सीआयडी’ने अजून तपासी अधिकारी निश्‍चित केलेले नाहीत. त्यामुळे गुन्ह्याची कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी ‘सीआयडी’चे अधिकारी अजून जिल्हा पोलिसांकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे अजून तरी गुन्ह्याचा तपास नगर पोलिसांकडेच आहे.