Mon, Apr 22, 2019 04:26होमपेज › Ahamadnagar › पुण्यातून दोन शार्पशूटर केले जेरबंद

पुण्यातून दोन शार्पशूटर केले जेरबंद

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 29 2018 11:46PMनगर : प्रतिनिधी

निघोज येथील संदीप वराळ खून प्रकरणात दीड वर्षांपासून फरार असलेल्या दोन शॉर्पशूटर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (दि. 29) पुण्यातील खडकवासला परिसरातून जेरबंद केले. यात सुशील सुखचंद लाहोटी (वय 35, रा. उत्तमनगर, अचानक चौक, पुणे), अनिल हरिचंद्र चव्हाण (वय 43, रा. उत्तमनगर, इंदिरा वसाहत, पुणे) यांचा समावेश आहे.

जानेवारी 2017 मध्ये निघोज येथे संदीप वराळ यांची सिनेस्टाईल हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून लाहोटी व चव्हाण हे फरार होते. पोलिस त्यांच्या मागावर होते. हे दोघे पुण्यातील खडकवासला परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, विशाल अमृते, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर आदींचे पथक पुण्यातील खडकवासला उत्तमनगर परिसरात गेले. त्यांनी सापळा रचून शार्पशूटर लाहोटी व चव्हाण या दोघांना जेरबंद केले. 

पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रवीण रसाळ, विकास रसाळ आदी आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.