नगर : प्रतिनिधी
केडगाव पोटनिवडणुकीचा निकाल व त्यानंतर झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या दिवशी नाशिक रोड कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप कोतकर हा दिवसभर कारागृहाबाहेर होता, अशी माहिती पोलिस चौकशीतून उघड झाली आहे. तो नेमका कशामुळे बाहेर होता, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्याची ‘सीआयडी’ने सखोल चौकशी केल्यास कारागृह प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांचा यात दोष आहे की नाही, हे स्पष्ट होईल.
7 एप्रिल रोजी केडगाव पोटनिवडणुकीचा निकाल होता. त्या दिवशी सकाळीच संदीप कोतकर याला नाशिक रोड कारागृहातून बाहेर काढण्यात आले होते. तो दिवसभर कारागृहाबाहेर होता व रात्री त्याला पुन्हा कारागृहात जमा करण्यात आले, असे चौकशीतून निष्पन्न झालेले आहे. त्याला नेमके कशासाठी बाहेर काढले, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, 7 एप्रिल रोजी त्याला वैद्यकीय तपासणीच्या कारणावरून कारागृहातून बाहेर काढण्याचे समजते. त्या दिवशी संदीप कोतकर याला कारागृहाबाहेर ठेवण्याची दक्षता घेणे, हे संशयास्पद आहे. त्याला केडगाव पोटनिवडणूक निकालाचा अंदाज मिळावा, यासाठी नियोजित व्यवस्था केल्याचा संशय व्यक्त होत आहे. संदीप कोतकर याचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळेच त्या प्रभागात पोटनिवडणूक झाली होती.
याच दिवशी सायंकाळी शिवसैनिक व कोतकर समर्थक रवी खोल्लम यांच्यातील वादातून दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्यावेळी संदीप कोतकर हा पत्नी सुवर्णा कोतकर व केडगाव परिसरातील समर्थकांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्कात असल्याची माहिती चौकशीतून पुढे आल्याचे सूत्रांकडून समजते. संदीप कोतकर हा वैद्यकीय तपासणीसाठी कारागृहाबाहेर होता की आणखी दुसरे कोणते कारण होते, याची ‘सीआयडी’कडून सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. त्या चौकशीतून यात कारागृह प्रशासनातील कोणाचा काही दोष आहे की नाही, हे तपासले जाऊ शकते.