होमपेज › Ahamadnagar › संदीप गुंजाळचा ‘नार्को’ला नकार

संदीप गुंजाळचा ‘नार्को’ला नकार

Published On: May 10 2018 1:32AM | Last Updated: May 09 2018 11:46PM



नगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप गुंजाळ याने ‘नार्को’सह इतर मानसशास्त्रीय चाचणी करण्यास नकार दर्शविला आहे. विशाल कोतकर याला गुरुवारी (दि. 10) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याच्यासह गुंजाळ याच्यावरील मानसशास्त्रीय चाचणीबाबत आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. 

दोन शिवसैनिकांनी हत्या केल्यानंतर पोलिसांत हजर झालेला आरोपी गुंजाळ हा 14 दिवस पोलिस कोठडीत होता. तो वारंवार त्याचे जबाब बदलत असल्याने संभ्रम झाला होता. विशाल कोतकर हाही तपासात सहकार्य करीत नाही. त्याच्या जबाबाबद्दल पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तपासात अडचणी येत होत्या. गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी संदीप गुंजाळ व विशाल कोतकर या दोघांच्या मानसशास्त्रीय चाचणीसाठी न्यायालयात अर्ज केला होता.

आरोपी गुंजाळ हा सध्या नाशिक रोड कारागृहात आहे. त्याने मंगळवारी त्याचे वकील अ‍ॅड. निलेश काळे यांच्यामार्फत न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले आहे. मानशास्त्रीय चाचणीवेळी भूल देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या केमिकल्सचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानसशास्त्रीय चाचण्या करण्यास विरोध असल्याचे त्यात म्हटले सांगितले. न्यायालयाने ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे आरोपीला विचारणा केली. त्यावेळीही आरोपीने चाचणी करण्यास नकार दिल्याचे आरोपीच्या वकिलांनी सांगितले. 

विशाल कोतकर याला मानसशास्त्रीय चाचणीबाबत म्हणणे सादर करण्यासाठी गुरुवारी (दि. 10) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. कोतकर याच्यासह संदीप गुंजाळ याच्या मानसशास्त्रीय चाचणीस परवानगी मिळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.