श्रीरामपूर : प्रतिनिधी
क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा केला म्हणून गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीपात्रातील वाळूचा ठेका बंद ठेवण्यात आला आहे. परंतु वाळू तस्करांनी पुन्हा या ठिकाणाहून वाळू उपशास सुरूवात केली आहे. यास विरोध करणार्या कोतवाल व एका ग्रामस्थास वाळू तस्करांनी कोंडून ठेवत वाळूचे डंपर पळविल्याची घटना सरला गोवर्धन परिसरात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तलाठी हेमंत शामराव डहाळे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी गौण खनिज चोरी, महसूल बुडविणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुड्डू यादव, सनी बोरुडे, सर्फराज (पूर्ण नाव माहित नाही), डंपर (एम.एच. 04 ए. सी.जी. 8797) वरील चालक व इतर दोघांचा आरोपीमध्ये समावेश आहे. तहसीलदार सुभाष दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. कर्मचार्यांना वाळूतस्करी थांबविण्या संदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार कोतवाल संदीप नवसरे यांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रातून वाळू चोरुन नेणारा डंपर (एम.एच. 04 ए. सी.जी. 8797) पकडला. त्यांनी ही माहिती तलाठी डहाळे यांना व मला दिली. आम्ही तातडीने सराला गावाकडे निघालो, मात्र आम्ही तेथे पोहचण्यापूर्वी आरोपींनी डंपर पळविला. त्यानंतर आम्ही तालुका पोलिस ठाण्यात जाऊन रितसर फिर्याद दिली. डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोदावरी नदीपात्रातील वाळूचा ठेका नाशिक येथील कंपनीला देण्यात आलेला आहे. या कंपनीच्यावतीने श्रीरामपूर येथील काही राजकीय गुंडा करवी हे काम सुरू आहे. त्यांनी रोज सुमारे 150 ते 200 डंपरद्वारे वाळू उपसा करण्यास सुरूवात केली. या धामधुमीत एका मजूराचाही मृत्यू झाला. परंतु हा मजूर नाशिक जिल्ह्यातील असल्याने याबाबत फारशी वाच्यता झाली नाही. संबंधीत ठेकेदाराने हे प्रकरण मिटवून घेतले. या घटनेनंतर तहसीलदारांनी या ठिकाणही पाहणी केली असता कंपनीने रोजच्या क्षमतेपेक्षा जास्त वाळू उचलल्याचे निर्दशनास आल्याने सदरचा ठेका तहसीलदारांनी थांबविला.
तहसीलदारांचा आदेश झुगारून गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा सुरूच होता. याबाबत माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी आवाज उठविला होता. तहसीलदार सुभाष दळवी यांच्याकडे तक्रारही केली होती. या सर्वाची दखल घेत महसूल प्रशासनाने काही वाहनांवर कडक कारवाई करीत सदरची वाळू वाहतूक थांबविली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून ही वाहतूक पुुन्हा जोमाने सुरू झाली आहे. यासाठी वाळू वाहणारे साम, दाम, दंड, भेद वापरण्यास सुरूवात केली आहे. ग्रामस्थांनी वाळू वाहतुकीस विरोध केल्याने त्यांना धमकविण्याचे प्रकार सुरू आहेत. एकाच वेळी नदीपात्रात 50 ते 75 डंपर उतरत असल्याने ग्रामस्थांच्या रात्रीच्या झोपा उडाल्या आहेत.