होमपेज › Ahamadnagar › वाळूतस्करीस परवानगी देऊन बांधला बंधारा! 

वाळूतस्करीस परवानगी देऊन बांधला बंधारा! 

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:13AMपारनेर/ जवळा ः प्रतिनिधी   

वाळूतस्करांना ओढ्यातील वाळू उपशासाठी परवानगी देऊन त्याबदल्यात ओढ्यावर बंधारा बांधून घेत जवळ्यातील ग्रामस्थांनी जणू प्रतिसरकार स्थापनेचीच चुणूक दाखवून दिली आहे! तीस लाख रुपयांच्या बंधार्‍यासाठी चार ते पाच कोटी रुपयांचा वाळू उपसा झाल्याचा आरोप करून कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे व शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकर्‍यांनी कालपासून ओढ्यात उपोषण सुरू केले आहे. 

कुकडी कालव्याचे आवर्तन सुटल्यानंतर ते साठविण्यासाठी बखाडी येथे बंधारा बांधण्यात यावा, ही या भागातील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. परंतु कालव्याच्या क्षेत्रात बंधार्‍यांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने अनेकदा मागणी करूनही हा बंधारा होत नव्हता. शेतकर्‍यांनी मातीचा बांध घालून पाणी आडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातून पाणी वाहून जात असल्याने त्याचा फारसा फायदा होत नसे. त्यावर शेतकर्‍यांनी इतर ग्रामस्थांना विश्‍वासात घेत नामी शक्कल लढविली. तशीही वाळूची तस्करी होत असताना या तस्करीस पाठबळ देऊन त्या बदल्यात बंधारा बांधून घेण्याचे ठरविण्यात आले. त्यास सर्वांची संमती मिळाल्यानंतर निघोज व अळकुटी परिसरातील वाळूतस्करांना ही वाळू उचलण्याची संमती देण्यात आली. तस्करांनी एका ठेकेदारास तीस लाख रुपयांना बंधारा बांधण्याचा ठेका देऊन दुसर्‍याच दिवशी वाळूचा बेसुमार उपसा सुरू केला. बंधारा बांधण्यासाठीही सुमारे शंभर ट्रक वाळू देण्यात आली. 

बंधारा पूर्ण होऊनही वाळू तस्करांकडून वाळूचा उपसा मात्र सुरूच होता. बाहेरचे तस्कर खुलेआम वाळू उपसा करीत असताना आपणही मागे का, या भूमिकेतून स्थानिकांनीही वाळूचा उपसा सुरू केला. त्यात तब्बल चार किलोमीटर क्षेत्रावरील संपूर्ण वाळू उचलण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्यामुळे वाळूचा बेकायदा उपसा करणार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यासंदर्भात महसूल तसेच पोलिस प्रशासनाकडेही तक्रार करण्यात आली. परंतु काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे घावटे व पवळे यांच्या नेतृत्वाखाली ओढ्यातच उपोषण सुरू करण्यात आले. झालेल्या वाळूउपशाचे मोजमाप करून सबंधितांकडून महसुलाची वसुली करण्याची आंदोलकांची मागणी आहे. सकाळी आंदोलन सुरू झाल्यानंतर सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती. उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.