Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Ahamadnagar › वाळूतस्कराला ‘एमपीडीए’!

वाळूतस्कराला ‘एमपीडीए’!

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 19 2018 12:08AMनगर : प्रतिनिधी

पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांच्यासह महसूल पथकावर हल्ला करणारा कुख्यात वाळूतस्कर हरीश उर्फ हरिभाऊ सतीश झंजाड (29, रा. अण्णापूर, ता. शिरूर, जि. पुणे) याला ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला. वाळूतस्करी रोखण्यासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनशाम पाटील यांनी दिली.

याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेत, वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्याचा ‘प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार नगर व पुणे जिल्ह्यात वाळूतस्करीद्वारे धुमाकूळ घातलेल्या झंजाड याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. झंजाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातील आणखी सहा वाळूतस्करांचे ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. या धडक कारवाईने वाळूतस्करांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांच्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

संघटित गुन्हे करणार्‍यांवर ‘एमपीडीए’ अर्थात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी झंजाड याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठविला होता. जिल्हाधिकार्‍यांनी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार व कर्मचार्‍यांनी शिरूर येथून त्याला ताब्यात घेतले.

वाळूतस्करांवर जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘एमपीडीए’ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. 2010 साली गुंड संतोष वायकर याच्यावर या कायद्यानुसार कारवाई झाली होती. जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या ‘रेकॉर्ड’वर असलेल्या गुन्हेगारांवर अशी कारवाई करण्यात येणार आहे. ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस निरीक्षकांकडून पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. हा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडून प्रांताधिकार्‍यांकडे जातो. त्यावर जिल्हाधिकारी निर्णय घेतात.

गेल्या चार वर्षांत पोलिसांनी पाठविलेले चार प्रस्ताव महसूल विभागाने नामंजूर केले आहेत. विशेष बाब म्हणजे चालू वर्षात तब्बल 18 वेळेस वाळूतस्करांनी महसूल विभागाच्या पथकावर हल्ला केल्याची नोंद आहे. खनिकर्म कायद्यानुसार जिल्हाधिकार्‍यांना कारवाईचे अधिकार आहेत. महसूल पथकाने गौणखनिज कायद्यानुसार कारवाई केलेल्या वाळूतस्करांचीही माहिती पोलिसांनी मागविली असून, अशा तस्करांवरही ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

गुंड झंजाडच्या गुन्ह्यांची ‘कुंडली’!

गुंड झंजाड याच्यावर पहिला गुन्हा 2013 साली वाळूचोरीबाबत पारनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2013 साली शिरूर पोलिस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल झाला. वाळूतस्करी करत असताना ती रोखण्यासाठी आलेल्या सरकारी पथकावर हल्ला केल्याने तिसरा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्यात 2015 साली दाखल झाला. तर मागील वर्षी वाळूतस्करी रोखणार्‍या पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांच्या पथकावर त्याने हल्ला चढविला होता.