Fri, Jul 19, 2019 07:33होमपेज › Ahamadnagar › वाळूतस्करांना आता स्मशानभूमीही पुरेना

वाळूतस्करांना आता स्मशानभूमीही पुरेना

Published On: May 19 2018 1:29AM | Last Updated: May 18 2018 11:39PMश्रीगोंदा : प्रतिनिधी

वाळू तस्करांना वाळूचा साठा सापडला की ती जागा कुठली आहे याचा पुढचा मागचा विचार न करता थेट वाळूउपसा करतात. याचीच प्रचिती आढळगाव ग्रामस्थांना आली. ज्या ठिकाणी जुनी स्मशानभूमी आहे त्याच ठिकाणाहून वाळू तस्करांनी वाळूउपसा केला. याच्यावर कळस म्हणजे कामगार तलाठ्याने वाळू उपशाचा पंचनामा केल्यानंतर दुपारनंतर वाळूउपसा सुरू होता. महसूल प्रशासनच जर वाळू तस्करांना पाठिशी घालत असतील तर वाळू तस्करीविरोधात जिल्हाधिकार्‍यांनी कितीही कडक कारवाईच्या घोषणा केल्या तरी त्याचा उपयोग शून्य आहे. 

भीमा आणि घोड नदीपात्रासह तालुक्यातील गावोगाव असणार्‍या नदीपात्रामधून वाळूउपसा सुरू आहे. तसाच वाळू उपसा आढळगाव येथेही सुरू आहे. ओढ्या-नाल्यामधला वाळूउपसा आता देवनदीच्या किनारी असणार्‍या स्मशानभूमीपर्यंत सुरू झाला आहे. वाळू तस्करांनी  वाळूसाठी थेट स्मशानभूमीच उकरल्याने गावातील काही मंडळीनी काल कामगार तलाठी यांना सोबत घेऊन स्मशानभूमी गाठली. तिथे उपसा केलेल्या वाळूचा पंचनामा करण्यात आला. कामगार तलाठी यांनीही वरिष्ठ कार्यालयास याबाबतचा अहवाल सादर केला.काही ग्रामस्थांनी महसूलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत कल्पना दिली. आता अधिकारी कारवाई करतील या आशेने ग्रामस्थ निघून गेले. 

नेत्याच्या पंटरकडून वाळूउपसा 

श्रीगोंदा तालुक्यात वाळूउपसा नवीन नाही.अनेक मंडळी या वाळू व्यवसायात उतरली आहेत.  त्यात राजकारणी मंडळीही अपवाद नाहीत. आढळगावच्या स्मशानभूमित जो वाळू उपसा केला गेला तो वाळू तस्कर एका नेत्याचा जवळचा पंटर असल्याचे बोलले जात आहे. 

कसा लागणार एमपीडीए एक्ट 

जिल्हाधिका री राहुल द्विवेदी यांनी वाळू तस्कर आणि तस्करीविरोधात कडक पाऊल उचलले जाईल असे स्पष्ट केले होते, मात्र तालुक्यातील एकंदरीत चित्र पाहता हे शक्य नसल्याचे दिसते.

एक तासाच्या अवधीने उपसा

ज्याने रात्री वाळू उपसा केला होता तो वाळूचा ट्रक घेऊन नदीत हजर झाला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की वाळू तस्कर आणि महसूल विभागातील अधिकारी- कर्मचारी यांचे नाते किती खोलवर रुजले गेलेले आहे. सगळ्यात कळस म्हणजे  काल दिवसाही जेसीबी मशीनच्या सहायाने वाळू उपसा सुरू होता. 

सगळीच मिलीभगत : वाकडे

आढळगावचे माजी सरपंच देवराव वाकडे म्हणाले, वाळू तस्करांनी चक्क स्मशानभूमी उकरुन वाळूउपसा केला आहे. याबाबत महसूल विभागाला ग्रामस्थांनी माहिती दिली होती मात्र कारवाई ऐवजी ज्याने वाळूसाठा करून ठेवला होता तो वाळू भरून नेण्यासाठी हजर झाला. यावरून सगळी मिलीभगत असल्याचे स्पष्ट होते.