होमपेज › Ahamadnagar › संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा महापालिकेला विसर!

संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा महापालिकेला विसर!

Published On: Feb 19 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 11:29PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्‍तव्यामुळे शिवभक्‍तांमध्ये संतापाची लाट उसळलेली असतांनाच छत्रपती संभाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा बसविण्यासाठी महापालिका प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. सुरुवातीला प्रोफेसर कॉलनी चौक व त्यानंतर गंगा उद्यानमधील जागा प्रस्तावित करण्यात आली. मात्र, संभाजी महाराजांचा पुतळा तयार होऊन तब्बल 10 वर्षे होत आली तरी पुतळा बसविण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी ही बाब उजेडात आणून आंदोलन छेडण्याचा इशारा आयुक्‍तांना दिला आहे.

प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा अश्‍वारुढ व पूर्णाकृती पुतळा बसविण्याबाबत 16 डिसेंबर 2008 रोजी स्थायी समितीने ठराव करुन मंजुरी दिली होती. शासनाच्या कला संचालनालयाकडूनही पुतळ्याच्या क्‍ले मॉडेलला 29 मे 2008 रोजीच मान्यता दिलेली आहे. 10.70 लाख रुपयांच्या या कामासाठी मनपाने निविदा मागवून 18 ऑगस्ट 2018 पुणे येथील मे. एस. बी. परदेशी आर्ट स्टुडिओ यांना कार्यारंभ आदेश दिलेला आहे. सुरुवातीला 5.35 लाख व त्यानंतर 3 लाख असे 8.35 लाख रुपये संबंधित संस्थेला अदाही करण्यात आलेले असून त्यांनी त्याच वेळी छत्रपती संभाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा तयार केलेला आहे.

2009 मध्ये तत्कालीन पोलिस अधिक्षक विजय चव्हाण यांनी मनपा आयुक्‍त व जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून प्रोफेसर कॉलनी चौकात पुतळा बसविण्यास आक्षेप घेतला. पुतळा पाहण्यासाठी होणारी गर्दी, रस्त्यावरील वाहतूक व वारंवार होणार्‍या गर्दीमुळे उभे होणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी पुतळा बसविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रोफेसर कॉलनी चौकात पुतळा उभारु नये, असा अभिप्राय देत पर्यायी जागा म्हणून गंगा उद्यान मध्ये पुतळा बसविण्यासाठी योग्य जागा असल्याचे मतही त्यांनी व्यक्‍त केले होते.

संबंधित संस्थेकडे पुतळा तयार आहे. पोलिस प्रशासनाने पर्याय सुचविलेला असतांना आणि पुतळ्याच्या कामासाठी 80 रक्कम अदा करण्यात आलेली असतांनाही गेल्या 10 वर्षांपासून सदरचा पुतळा बसविण्यास महापालिका प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र आहे. गंगा उद्यानची जागा मनपाच्याच मालकीची आहे. त्यामुळे या ठिकाणी पुतळा उभारण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आयुक्‍तांनी याची तात्काळ दखल घेऊन पुतळा बसविण्यासाठी गंगा उद्यानमध्ये जागा मार्किंग करुन देण्यासाठी नगररचना विभागास आदेश द्यावेत. लवकरात लवकर पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते बोराटे यांनी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत महापालिकेने गेली 10 वर्षे दाखविलेली उदासीनता चव्हाट्यावर आली आहे.