Tue, Mar 19, 2019 09:14होमपेज › Ahamadnagar › ‘वॉटर कप’साठी सक्करवाडी ग्रामस्थांची धडपड

‘वॉटर कप’साठी सक्करवाडी ग्रामस्थांची धडपड

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:52PMनान्नज : वार्ताहर

नगर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या हद्दीवर व  जामखेड तालुक्यातील नान्नज गावापासून  अवघ्या 8 कि. मी. अंतरावर असणार्‍या  परांडा तालुक्यातील सक्करवाडी या गावाने सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत एकजुटीने श्रमदान करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा निर्धार केला आहे. 

सक्करवाडी(ता. परांडा)  येथील नागरिकांनी 8 एप्रिल पासून एकजुटीने चुलबंद करुन श्रमदानाला सुरूवात केली असून आतापर्यंत झालेल्या कामाला 100 पैकी 87 गुण मिळविले  असुन राज्यात सक्करवाडी हे गाव सद्या प्रथम क्रमांकावर आहे. गावातील 200 अबालवृध्द सकाळी व संध्याकाळी असे 8 तास श्रमदान करीत आहेत. आतापर्यंत 6 हजार  घनमीटरच्यावर येथील नागरिकांनी श्रमदान करुन मोठे काम केले आहे. यंत्राद्वारे 70 हजार घनमीटरच्यावर काम झाल्याने यावर्षी पावसाळ्यात 120 कोटी लिटर पाणी साठले जाणार आहे. सक्करवाडी या गावाची भौगोलिक परिस्थिती मोठी असून तिन्ही बाजुने डोंगराचा भाग लाभलेला आहे. डोंगराच्या माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत पावसाचा एक एक थेंब अडविण्याचा आटोकात प्रयत्न येथील नागरिकांनी केला आहे.

राज्यातील प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी येथील नागरिक रात्रं-दिवस एकजुटीने श्रमदान करीत आहेत. शोषखड्डे 108, नर्सरीतील 2 हजार रोपे, माती परीक्षण 100 टक्के, जलबचत तंत्रज्ञान 60 हेक्टर, जुन्या रचना दुरुस्ती व सर्वेक्षण आदी प्रकारची कामे प्रगतीपथावर आहेत. 8 एप्रिल पासून  येथील नागरिकांचे दिवस-रात्र  श्रमदान सुरू असून राज्यातील प्रथम क्रमांक आपल्याच गावाला मिळाला पाहिजे, यासाठी धडपड करीत आहेत. मुख्याध्यापक अमोल अंधारे व शिक्षक सुखदेव भालेकर हे नागरिकांना  मार्गदर्शन करीत आहेत.