Thu, May 23, 2019 04:40होमपेज › Ahamadnagar › एसटी भाडेवाढीतून सरकारकडून लूट!

एसटी भाडेवाढीतून सरकारकडून लूट!

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 17 2018 10:25PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता अगोदरच होरपळून निघाली असताना आता इंधन दरवाढीचे कारण सांगून सर्वसामान्य नागरिकांवर लादलेली एसटीची 18 टक्के प्रवासी भाडेवाढ म्हणजे भाजप-शिवसेना सरकारने सुरू केलेली लुटमार असल्याचे विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.शनिवारपासून लागू केलेल्या एसटी प्रवासी भाडेवाढीवर संताप व्यक्त करताना विखे पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलची दरवाढ हे केंद्र सरकारचे पाप असून या दरवाढीचे कारण सांगून शिवसेनेकडे असलेल्या परिवहन विभागाने महाराष्ट्राच्या जनतेवर एसटीची 18 टक्के प्रवासी भाडेवाढ लादली आहे. आजपर्यंत शिवसेना सतत सांगत होती की, सरकारच्या पापांमध्ये आम्ही भागीदार नाही. आम्ही सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करीत आहोत. पण या दरवाढीमुळे आता शिवसेनेचाही खरा चेहरा समोर आला आहे.

मंत्रिमंडळातील सहभागी पक्ष म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक पापात शिवसेनाही तेवढीच दोषी आहे. शिवाय सर्वसामान्य एसटी प्रवाशांवर दरवाढ लादून शिवसेनेने आपण जनतेची लुटमार करण्यातही सहभागी असल्याचे सिद्ध केले आहे. भाजप सरकारच्या पापांमध्ये शिवसेना सहभागी असल्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही. यापूर्वीही अनेकदा भाजपशी त्यांचे आतून असलेले साटेलोटे महाराष्ट्राने अनुभवले आहे. यापुढे शिवसेनेला सरकारच्या कोणत्याही निर्णयाची जबाबदारी झटकता येणार नाही. त्यांनी यापुढे उगाच जनतेप्रती खोटा कळवळा दाखवून सरकारवर टीका करण्याची नौटंकी करू नये. कारण त्यांचा सत्तेसाठी स्वार्थी आणि तेवढाच लाचार झालेला चेहरा या निमित्ताने उघडा पडल्याची बोचरी टीकाही विरोधी पक्षनेत्यांनी केली.

पीककर्जासंदर्भात राज्यभरातून तक्रारी येत असताना सरकारकडून तातडीने पावले उचलली जात नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्री परदेशातून आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांकडून सांगितले जाते. आता पेरणीची वेळ असताना शेतकर्‍यांनी पीककर्जासाठी मुख्यमंत्री विदेशातून येईपर्यंत वाट बघायची का?, अशी संतप्त विचारणा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी यावेळी केली.अनुसूचित जाती व ल्पसंख्यांकांच्या पालकत्वाच्या घटनादत्त कर्तव्याचा सरकारला विसर पडल्याचे सांगत ना. विखे यांनी यावेळी जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथे अनुसूचित जातीच्या तीन मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.