Sun, Mar 24, 2019 22:57
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › एसटी धडकेत दाम्पत्य ठार

एसटी धडकेत दाम्पत्य ठार

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 1:40AMकरंजी : वार्ताहर

पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (दि.5) सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अडीच तास रास्तारोको केला. तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

राहुल महादेव राठोड व मनिषा राहुल राठोड (रा. निमगाव मायंबा, ता. शिरूर, जि.बीड) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुल राठोड हे पत्नी मनिषासह अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमासाठी निमगाव मायंबा येथे आले होते. सप्ताहाचा कार्यक्रम आटोपून बुधवारी सकाळी कंपनीमध्ये हजर होण्यासाठी पत्नीला सोबत घेऊन ते पाथर्डीमार्गे पुण्याकडे जात होते. देवराई गावाजवळ समोरून येणार्‍या कोल्हापूर-पाथर्डी (क्र.एमएच14 बीटी4875) या एसटीच्या चालकाने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात बस समोरून येणार्‍या मोटारसायकलच्या (क्र.एमएच12 पीयू3235) दिशेने घेतली. त्यामुळे मोटारसायकलला बसची जोराची धडक बसल्याने त्यावरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने बस पुन्हा पाठीमागे घेत बाजूला आणून उभी केली आणि तो वाहकासह तेथून दुसर्‍या बसने निघून गेला.

अपघातग्रस्तांना मदत न करताच चालक व वाहकाने  तेथून निघून गेल्याने देवराई येथील ग्रामस्थ संतप्त झाले. देवराई येथे महामार्गावरील खड्ड्यांमुळे या ठिकाणी आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला. त्यास महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याने त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत अ‍ॅड. सतीश पालवे, माजी सरपंच रविभूषण पालवे, माजी उपसरपंच रामनाथ पालवे, सरपंच ताराबाई क्षेत्रे याच्यासह ग्रामस्थांनी अपघातस्थळी सुमारे अडीच तास रास्तारोको आंदोलन केले. अपघातानंतर अ‍ॅड. सतीश पालवे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फोन लावला असता तो बंद असल्याचेेे दोन तासांनी उशिरा आलेल्या पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे यांनी आंदोलकांना सांगितले. पोलिस उशिरा आल्याने ग्रामस्थांनी त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. 

अपघात घडल्यापासून रस्त्यावरून तीन 108 अ‍ॅम्ब्युन्स गेल्या. परंतु, त्यांनी मयतांना गाडीत घेता येत नसल्याचे कारण पुढे केले. त्यांच्या आडमुठेपणामुळे मृतांची हेळसांड झाली असून, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी पालवे यांनी यावेळी केली. घटनेची माहिती समजताच तहसीलदार नामदेव पाटील यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच दोन दिवसांत देवराईजवळील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह पाथर्डीला पाठविण्यात आले व आंदोलन स्थगित करण्यात आले.