Fri, May 24, 2019 02:25होमपेज › Ahamadnagar › दौंड गोळीबार प्रकरणी एसआरपीएफच्या जवानाला अटक 

दौंड गोळीबार प्रकरणी एसआरपीएफच्या जवानाला अटक 

Published On: Jan 16 2018 8:42PM | Last Updated: Jan 16 2018 8:42PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

दौंड परिसरात तिघांवर गोळीबार करणारा एसआरपीएफचा जवान संजय शिंदे हा सुपा परिसरात पोलिसांच्या हाती लागला आहे. तो मोपेडवरून पुणे रस्त्याने नगरच्या दिशेने येत असताना सुपा पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडून एक पिस्तुल व 12 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. मंगळवारी (दि. 16) पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

तिघांचा खून केल्यानंतर गोळीबार करणारा माथेफिरू शिंदे हा त्याच्या दौंड येथील नगर रस्त्यावर असलेल्या घरी लपून बसल्याचा संशय पोलिसांनी होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या मोठ्या फौजफाट्याने शिंदे याच्या घराला वेढा घालता होता. बराच वेळ पोलिस घराला वेढा घालून होते. परंतु, बराच वेळानंतर तो घरात नसल्याचे स्पष्ट झाले. तो तेथून पसार झाला होता. शिंदे हा नगर रस्त्याने येण्याची शक्यता पुणे ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाने नगर पोलिस नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यांनी ही माहिती सुपा पोलिस ठाण्यास कळविली. 

सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने टोलनाक्यापासून काही अंतरावर सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास विनानंबरच्या ज्युपीटर मोपेडवरून तो नगरच्या दिशेने भरधाव वेगात येत असल्याचे दिसले. त्याच्याकडे पिस्तुल असल्याची शक्यता असल्याने थेट पकडणे धोक्याचे होते. म्हणून पोलिसांनी टोलनाका ओलांडून त्याला नगरकडे काही अंतर येऊ दिले. त्यानंतर त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. तो जवळ येताच पोलिसांनी त्याच्या एका बाजूने चारचाकी वाहन व दुसर्‍या बाजूने दोन मोटारसायकलींनी वेढले. इंग्रजतील ‘व्ही’ आकाराप्रमाणे घेरून त्याला दुचाकीचा वेग कमी करण्यास प्रवृत्त केले व वेग कमी होताच पाठलाग करणार्‍या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या पोलिसाने त्याच्या दिशेने एसएलआर रायफल रोखली. त्यानंतर काही क्षणातच झडप घालून त्याला पकडले. त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल व 12 जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे एकूण 22 काडतुसे होती, त्यातील 10 त्याने दौंड येथे फायर केल्याचे सांगितले. ताब्यात घेऊन त्याला सुपा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पळून जाण्यास वापरलेली मोपेडही ताब्यात घेतली.

तो एसआरपीएफमध्ये सेवेत असल्याने दौंड येथे वास्तव्यास होता. त्याचे मूळ गाव जामखेड तालुक्यातील खर्डा येथे असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली. त्याची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी शिवाजी कडूस, सुखदेव दुर्गे, यशवंत ठोंबरे, अनिल गिरीगोसावी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.