Thu, Aug 22, 2019 13:03होमपेज › Ahamadnagar › ‘एसआयटी’ने घेतली तपासाची सूत्रे

‘एसआयटी’ने घेतली तपासाची सूत्रे

Published On: Apr 10 2018 1:17AM | Last Updated: Apr 10 2018 12:47AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार हे गुन्ह्याचे तपासी अधिकारी म्हणून काम पाहतील. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल (दि. 9) सकाळी याबाबतचा आदेश काढला आहे. 

विशेष तपास पथकाने तातडीने गुन्ह्याची सूत्रे हाती घेतली असून, त्यांनी गोळीबार करणारा आरोपी संदीप गुंजाळ याची सोमवारी सुमारे दोन तास कसून चौकशी केली. चौकशीनंतर तीन तास पथकाची गोपनीय बैठक सुरू होती. या बैठकीत तपासाची दिशा ठरविण्यात आली. तसेच गुंजाळ याने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यात येत होती. 

तपास पथकात अपर अधीक्षक रोहिदास पवार (प्रमुख), सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार (तपासी अधिकारी), सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांचा समावेश आहे. 

गुंजाळ याने राजकीय वैमनस्यातून खून केला, कुणाच्या सांगणावरून केला अथवा त्यामागे आणखी कोणते कारण आहे, याबाबत चौकशी केली जात आहे. सुरुवातीला गुंजाळ याने तपासात चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता त्याच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागली आहे, असे सूत्रांकडून समजले. 

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, Shivsainik murder case, Kedgaon, SIT, investigations,