होमपेज › Ahamadnagar › जामखेड हत्याकांडाच्या तपासासाठी ‘एसआयटी’

जामखेड हत्याकांडाच्या तपासासाठी ‘एसआयटी’

Published On: May 03 2018 1:27AM | Last Updated: May 02 2018 11:28PMनगर : प्रतिनिधी

जामखेड येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे. तसेच हा तपास उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल (दि. 2) या पथकात चार अधिकार्‍यांना नियुक्त केल्याचा आदेश काढला आहे.

‘एसआयटी’चे प्रमुख म्हणून अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांची नियुक्ती केली आहे. पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे (तपासी अधिकारी), जामखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पगार यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

हे पथक गुन्ह्याचा सविस्तर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करेल. पोलिस अधीक्षक शर्मा यांच्याकडून वारंवार तपासाचा आढावा घेतला जाईल. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पाच ‘एसआयटी’ नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यातील केडगाव दुहेरी हत्याकांड, पोलिसांवर दगडफेक करून धक्काबुक्की व शिवीगाळ, उद्योजक बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरण असे तीन गुन्हे व भिंगार कँप पोलिस ठाण्यातील दाखल असलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात असे चार गुन्ह्यांत श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक रोहीदास पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयटी’ नियुक्त करण्यात आल्या आहेत. आता जामखेड येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासासाठीही विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे.

पांडुरंग पवार यांच्याकडे जामखेडचा पदभार

जामखेड पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी दहशतवाद विरोधी सेल येथे नेमणुकीस होते. अनेक महिन्यांपासून जामखेड पोलिस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे होता. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन तेथे तात्पुरत्या स्वरुपात पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे.