Mon, Nov 19, 2018 04:10होमपेज › Ahamadnagar › सावधान! तुमचीही कोणीतरी वाट पहातयं  

सावधान! तुमचीही कोणीतरी वाट पहातयं  

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:32AMखेड : विजय सोनवणे 

भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचा...मिळेल ते खायचं-घ्यायचं आणि आपल्या घरातील मुलांनाही खाऊ घालायचं. पण जीवनाच्या या संघर्षात तुमचाही ठेचून जीव गेला तर तुम्ही काय करणार? कारण सावधान! तुमचीही घरी कोणीतरी वाट पहातय! 

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा (ता.साक्री) येथे भटक्या विमुक्त समाजाच्या पाच निरपराधांचा ठेचून खून करण्यात आला. मंगळवेढा (जि.सोलापूर) येथील रहिवासी असलेल्या या निरपराधांची घरी कोणीतरी वाट पाहातय, हे विसरून गेलेल्या या समाजाला ‘माणसातली माणुसकी हरवली काय’? असा सवाल प्रत्येकजण विचारत आहे. समाजातील आर्थिक विषमता ही गरीब कुटुंबाच्याच वाट्याला येते आणि पोटाची खळगी भरताना संघर्ष करून ठेचून खून केला जातो ही बाब खरोखरच निंदनीय आणि समाजमनाला खिन्न करणारी आहे.

मुले पकडणारी टोळी येते आणि मुलांना पळवून नेते या संशयास्पद बातमीने देशभरात हाणमारीच्या घटना घडत आहेत. बातमी सोशल मीडियावर गेली दोन महिन्यांपासून इतकी पसरली की त्याचा परिणाम शेवटी जीवावर बेतला.कोणत्याही बातमीची शहानिशा, चौकशी करायची नाही आणि त्यावर विचार न करताच मेसेज फॉरवर्डिंग ते निष्पाप जीवांचा बळी घेण्यापर्यंत मजल गेलेल्या या समाजकंटकांना काय म्हणावे? असा सवाल पुरोगामी म्हणावणार्‍या समाजाला पडला आहे. 

अफवांवर विश्वास ठेवून घडत असलेल्या घटनांमध्ये निर्दोष, निरपराध लोकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. भिकारी, वाटसरू,बहुरूपी यांची शहनिशा न करताच त्यांच्यावर असे प्राणघातक हल्ले करणे माणुसकीला काळिमा फासल्यासारखे आहे. तशी अनोळखी व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास तात्काळ पोलिस यंत्रणेला कळवणे गरजेचे असताना आपल्या हातात कायदा घेवून एखाद्याच्या जिवीताचा ठेचून अंत करणे मानवी मनाला खिन्न करणारे आहे.माणसातली माणुसकी खरोखरच हरवली आहे काय?याचे आत्मपरीक्षण करण्याची योग्य वेळ आलेली आहे.

सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा

सध्या सोशल मीडियावर चाललेली चढाओढ निष्पाप जिवांची बळी ठरत आहे. कोणत्याही घटनेची खातरजमा न करता त्याचा प्रचार करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आढळून आल्यास अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. - वैभव महांगरे (पोलिस उपनिरीक्षक,राशीन दूरक्षेत्र)