Fri, Nov 16, 2018 15:41होमपेज › Ahamadnagar › नगर : पोलिस निरीक्षकांची ६ लाख रूपयांची फसवणूक  

पोलिस निरीक्षकांची ६ लाख रूपयांची फसवणूक  

Published On: Aug 12 2018 6:08PM | Last Updated: Aug 12 2018 6:08PMनगर : प्रतितिनधी

शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना दोघांनी सुमारे सव्वासहा लाख रुपयांना गंडिवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भ्रमणध्वनीवरून  आमदार विनायक मेटे यांचा आवाज काढून फसविल्याचे ओमासे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात नवनाथ हरिचंद्र इसरवाडे (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संशयीत आरोपी इसरवाडे हा शिवसंग्राम संघटनेचा  तालुका अध्यक्ष व शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांचा नातेवाईक असल्याचे ओमासे यांना सांगत होता. तसेच एक व्यक्ती त्याच्या मोबाईल क्रमांकावरून आमदार मेटे यांचा आवाज काढून ओमासे यांच्याशी बोलत होता.  आपल्याशी फोनवरून मेटे हेच बोलत आहेत, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे वेळोवेळी ओमासे यांनी इसरवाडे याला सहा लाख २० हजार रुपये दिले. मात्र, आपण मेटे यांच्याशी बोललो नाही. आपली फसवणूक झालेली आहे, असे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून इसरवाडेसह एका  अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिस ठाण्यात संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.