Thu, Jul 18, 2019 06:07होमपेज › Ahamadnagar › बोंडअळीचे १.४६ कोटी रुपये जमा

बोंडअळीचे १.४६ कोटी रुपये जमा

Published On: Jul 06 2018 1:30AM | Last Updated: Jul 05 2018 11:14PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील 28 गावातील 2 हजार 41 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात बोंडअळीचे 1 कोटी 45 लाख 98 हजार 630 रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. 

मागील वर्षी तालुक्यात अनेक शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केली होती. पावसाचे प्रमाणही समाधानकारक असल्याने कपाशीचे पीक चांगले आले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी कपाशीचे पीक नांगरून टाकले. त्यामुळे कर्ज काढून उभे केलेले पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे शासन स्तरावरुन बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे महसूलमार्फत पंचनामे करण्यात आले. मात्र, पंचनामे करूनही सहा सात महिने अनुदान मिळत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये निराशा पसरली होती. याबाबत शासन स्तरावरही अनेकांनी पाठपुरावा केला. अखेर बोंडअळीचे पहिल्या टप्प्यातील तालुक्यासाठी 1 कोटी 45 लाख 98 हजार 630 रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग झाले आहे.

तालुक्यातील बेलापूर खुर्द, बेलापूर बुद्रुक, भेर्डापूर, ब्राह्मणगाव वेताळ, ऐनतपूर, एकलहरे, फत्याबाद, गळनिंब, कडित बुद्रुक, कडित खुर्द, कान्हेगाव, खंडाळा, खोकर, कुरणपूर, लाडगाव, मालुंजा, माळवाडगाव, मांडवे, मातापूर, मुठेवाडगाव, नरसळी, निपाणी वडगाव, पढेगाव, शिरसगाव, टाकळीभान, उक्कलगाव, उंबरगाव, वळदगाव, वडाळा या 28 गावांचा समावेश आहे. या गावातील संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर बोंडअळी अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.  दरम्यान, मोठ्या प्रतीक्षेनंतर अनुदान वर्ग झाल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.