होमपेज › Ahamadnagar › सीना धरणातून शेतीसाठी आवर्तन

सीना धरणातून शेतीसाठी आवर्तन

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 11:08PMकर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी कुकडीचे आवर्तन सुटले असतानाच सीना धरणामधून ‘टेल टू हेड’ आवर्तन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यामुळे सुटले आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी दिली. या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदी झाले आहेत. 

कर्जत तालुक्यातील सीना धरणात यावर्षी परिसरात पाऊस नसल्याने फारसे पाणी नव्हते. मात्र कुकडीचे पाणी धरणात सोडल्यामुळे पाणीसाठा पुरेसा झाला. आता खरीप पिकांना हे पाणी गरजेचे होते. पाणी सोडल्यामुळे खरिपाला जीवदान मिळणार आहे.

खेडकर यांनी सांगितले की, सीना धरणाचे पाणी शेतीसाठी ‘टेल टू हेड’ सोडण्यात आले आहे. परिसरात कापूस हे प्रमुख पीक आहे. तसेच बाजरी, मका, उडीद ही पिके व काही प्रमाणात ऊस व फळबागा मोठ्या संख्येने आहेत. यंदा पेरणीनंतर पाऊस पडला नाही. त्यामुळे सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे मी सतत पाठपुरावा केला. त्यांनी सिना प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या सूचना पाटंबधारे विभागाच्या अधिकर्‍यांना दिल्या. सीना धरणाच्या पाण्याचा लाभ तालुक्यातील पुर्व भागतील निमगाव, नागापूर, माही, मलठणपासून दिघीपर्यंतच्या अनेक गावांना होतो.