Wed, Apr 24, 2019 08:07होमपेज › Ahamadnagar › रस्ता लुटणार्‍या टोळ्या जेरबंद

रस्ता लुटणार्‍या टोळ्या जेरबंद

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:10PM

बुकमार्क करा
राहुरी : प्रतिनिधी

नगर-मनमाड रस्त्यावर वाहन चालकांची लूट करून पोलिस प्रशासनाला जेरीस आणलेल्या दोन टोळ्यांना जेरबंद करण्यात काल पहाटे राहुरी पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, याप्रकरणात दोन टोळ्यातील 8 जणांना अटक करण्यात आल्याने दोन मोठ्या टोळींचा पर्दाफाश झाला आहे.

साईनाथ माधव जाधव ( वय 29 रा. नाशिक) हे दि. 12 रोजी रात्री 8 च्या सुमारास दुचाकीवरून राहुरीकडून नगरकडे जात होते. दरम्यान, धामोरी परिसरातील तांबे पेट्रोल पंपासमोर  मयूर दत्तात्रय कदम (रा. बारागाव नांदूर), प्रकाश बाळासाहेब जगताप (रा. जुना कणगर रोड, राहुरी), आकाश तात्यासाहेब शेडगे (जुना कनगर रोड राहुरी), प्रकाश उर्फ किसन बाळासाहेब म्हस्के (राहुरी), अक्षय मधुकर शिरसाठ (देसवंडी), अविनाश श्रीधर साळवे (डिग्रस) या सहा जणांनी आपल्या दुचाकी आडव्या घातल्या. यावेळी साईनाथ माधव यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील रोख रक्कम 16 हजार व 16 हजार 500 रुपये किंमतीचा एचटीसी कंपनीचा मोबाईल असा एकूण 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला.

सदरचा प्रकार पेट्रोल पंपावरील फिरत्या कॅमेर्‍यात कैद झाला होता. याची माहिती घेत साईनाथ जाधव यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तपासाला गती देण्याचा निर्णय घेत पेट्रोलपंपावरील सीसीटीव्हीची तपासणी केली.     यावेळी पोलिसांना संबंधित लुटारूंनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्याचे समजले. त्यानुसार आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना सोयीस्कर ठरले.वरील सर्व 6 आरोपींना पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदशनाखालील पथकाने  सिनेमा थिएटर, विद्यापीठ परिसर तर काहींना घरातून ताब्यात घेतले. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  

तर दुसर्‍या एका घटनेत राहुरी कारखाना येथे हॉटेल प्रयागासमोर प्रवासी कैलास बळीराम जाधव (रा. चाळीसगाव सांगावी) हे दुचाकीवर जात असताना त्यांना दोघांनी आम्हाला कोल्हारपर्यंत यायचे आहे, असे सांगत लिफ्ट मागितली. यावेळी दोघांपैकी एक जण स्वतः दुचाकी चालवायला बसला. दोघांनी कैलास जाधव यांना देवळाली प्रवरा ते श्रीरामपूर रस्त्याकडे नेत त्यांच्याकडील 3 हजार रुपये व मोबाईल लुटला. याबाबत कैलास जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपासाला गती देत आरोपी कैलास धोत्रे आणि अनिल बाळू इघे यांना शिताफीने अटक केली. या दोन्ही प्रकरणाबाबत पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांची भूमिका निर्णायक ठरली. याप्रमाणे एकाच रात्री दोन लुटारूंच्या टोळ्या पकडल्याने राहुरी पोलिस प्रशासनाच्या कार्याचे कौतूक केले जात आहे.