Wed, Apr 24, 2019 15:44होमपेज › Ahamadnagar › वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली लुटणारी टोळी जेरबंद 

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली लुटणारी टोळी जेरबंद 

Published On: May 31 2018 10:44PM | Last Updated: May 31 2018 10:44PMनगर : प्रतिनीधी 

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे आमिष दाखवून  लुटणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. पाच जणांना अटक करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्‍यांकडून ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

अमित राजेंद्र प्रजात सिंग (रा. पणजी, गोवा),  राहुल सुवेंद्रकुमार शर्मा (रा. सहारपूर, उत्तरप्रदेश), राहुलकुमार विद्यासागर दुबे (रा.फरीदाबाद, दिल्ली), संदीप दिनानाथ गुप्ता (रा. मीरा रोड, ठाणे), कौशिक श्रीरापगुजर तिवारी (रा. फरीदाबाद एमआयडीसी, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्‍यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक कार, किमती मोबाईल, नगरमधील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयाचे बनावट शिक्के, लेटरहेड, डीडी, रोख रक्कम असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. बनावट प्रवेशाबाबत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई झाली. या टोळीने देशभरातील अनेकांना गंडविल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. या टोळीने लातूर येथील अजिंक्य बिराजदार यांना 10 लाख 50 हजार रुपयांना लुटल्याची कबुली दिली आहे.

दोन वर्षांपासून शासनामार्फतच प्रवेश
मेडिकल कॉलेज प्रवेशासंदर्भात कॉलेजकडून पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता लक्षात आले की, महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपासून शासनस्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. महाविद्यालय व महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांचा प्रवेश प्रक्रियेशी काहीएक संबंध ठेवलेला नाही. विद्यार्थी व पालकांना नम्र विनंती आहे की, आपण वैद्यकीय प्रवेश घेतेवेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून आपल्या प्रवेशाबाबत खात्री करावी व अशा बनावट टोळ्या व रॅकेटपासून सावध रहावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.