होमपेज › Ahamadnagar › दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:20AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या सहा जणांच्या टोळीतील चौघांना जेरबंद करण्यात श्रीगोंदा आणि कर्जत पोलिसांना यश आले आहे. जवळपास 25 किलोमीटर पाठलाग करून या टोळीला पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, सहा जीवंत काडतुसे आणि एक इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली. 

मिथुन मारुती पालघर (रा. मावळ, पुणे), अनिल अंकुश शिंदे (रा. मुळशी), सुनील गजानन ठाणेकर, सुनील निमसे (रा. केमसेवाडी, मावळ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सविस्तर माहिती अशी की, आरोपी श्रीगोंदा-कर्जत रस्त्यावर असणार्‍या कोपर्डी येथील एका हॉटेलवर इनोव्हा गाडीमधून (एम एच14 ई पी-8163) काल (दि. 24) दुपारी चारच्या  सुमारास आले. गाडीतील सहा जण नशेत तरर्र झाले. त्याच दरम्यान त्या सहा जणांमध्ये दरोडा टाकण्याविषयी चर्चा झाली. याबाबत पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे आणि कर्जतच्या पोलिस निरीक्षकांना माहिती मिळाली. त्यांनी लगेच कुळधरण शिवारात धाव घेतली. मात्र त्या पूर्वीच आरोपी श्रीगोंद्याच्या दिशेने गेले होते. पोलिस उपअधीक्षक मुंढे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली. 

त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे, पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्या पथकाने श्रीगोंदा शहरात नाकाबंदी सुरु केली. काही पोलिस कर्मचार्‍यांनी हिरडगाव चौफुला येथे सापळा लावला. भरधाव वेगाने जाणारी ही गाडी हिरडगाव चौफुला येथे अडविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ते  शक्य झाले नाही.  श्रीगोंदा शहरात असणार्‍या घोडेगाव चौकात ही इनोव्हा गाडी आली असता पोलिसांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला. गाडीतील चौघांनी गाडी थांबवून रस्त्याच्या बाजूला पळ काढला. पोलिस पथकाने या चौघांचा सिनेस्टाइल पाठलाग करत त्यांना जेरबंद केले.

त्यांची झडती घेतली असता त्यातील एकाकडे गावठी कट्टा व त्यामध्ये सहा राऊंड लोड केलेले आढळून आले. पोलिसांनी गावठी कट्टा, इनोव्हा गाडी आणि चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले.

या कार्रवाईत पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण,  सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे, पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव, पालवे, पोलिस कर्मचारी घोडके, सागर जंगम, सुनील खैरे, फिरोज पठाण, अनमोल चन्ने, इरफान शेख, कोहका जाधव, अंकुश ढवळे, प्रकाश वाघ, किरण बोराडे, दादासाहेब टाके, उत्तम राउत यांनी सहभाग घेतला.