Tue, Jun 25, 2019 21:35होमपेज › Ahamadnagar › सिद्धटेकमध्ये रस्तारोको

सिद्धटेकमध्ये रस्तारोको

Published On: May 18 2018 1:14AM | Last Updated: May 17 2018 10:46PMसिद्धटेक : वार्ताहर

सिद्धटेक-बेर्डी ग्रुप ग्रामपंचायत (ता. कर्जत) अंतर्गत येणार्‍या वडार वस्ती वरील ग्रामस्थांनी  महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात दौंड-राशीन राज्य मार्गावर गुरुवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सकाळी पुणे, दौंड, बारामती, श्रीगोंदा, कर्जतकडे जाणारी वाहने अडकून पडली होती. 

सदर वस्तीवरती शेतीसाठी व घरगुती वीजपुरवठा करणार्‍या वीजवाहिनीच्या तारा नियमांपेक्षा जास्त खाली आल्या आहेत. वादळी पावसामध्ये अनेक वेळा तारा तुटून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.तसेच प्राथमिक शाळेजवळून जाणार्‍या वीजवाहिनीही धोकादायक बनली आहे. यामुळे जीवित व वित्तहानी होऊ शकते .या विषयी महावितरणकडे ग्रामस्थांनी वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करून काहीच दखल न घेतल्याने आंदोलन करावे लागले.

सध्या सिद्धटेक परिसरातील वीज वाहिनीच्या तारा कमजोर झाल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणचे लोखंडी खांब कुजले आहेत. शेतामधील खांब ही अनेक ठिकाणी कलले आहेत. काहीचे आधारासाठी दिलेले ताण निघाले आहेत. यामुळे भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी स्थानिक नागरिक व वायरमन यांना धोकादायक खांब व वीजवाहिनीचा सर्वे करण्यास सांगून त्याची पावसाळा सुरू होण्याआगोदर तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

सदर मागण्या संदर्भातील निवेदन राशीन महावितरण विभागाचे  उपअभियंता श्री. रंजन यांनी स्वीकारले. जळालेले विद्युत रोहित्र व वीजवाहिनीच्या तारा आठ दिवसांमध्ये बदलून दिल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले. आश्वासनाप्रमाणे  महावितरणने उपाययोजना केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नितीन जाधव, सुभाष चौगुले, नवनाथ मोरे, बालाजी शेलार, राहुल हरिहर व ग्रामस्थांनी दिला आहे.