Mon, Jul 13, 2020 11:47होमपेज › Ahamadnagar › यचिंचोलीत धनगर आरक्षणासाठी रास्तारोको

यचिंचोलीत धनगर आरक्षणासाठी रास्तारोको

Published On: Aug 14 2018 1:11AM | Last Updated: Aug 13 2018 11:41PMकोल्हार खुर्द : वार्ताहर

धनगर समाजाला आरक्षण मिळावे व त्यांना इतर सुविधा मिळण्यासाठी धनगर समाजाच्यावतीने राहुरी तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येत नगर-मनमाड महामार्गावर रस्तारोको करत आंदोलन केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

चिंचोली, कोल्हार खुर्द, पिंपळगाव, संक्रापूर परिसरातील शेकडो धनगर समाज बांधवांनी चिंचोली येथे नगर-मनमाड महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आंदोलकांनी महामार्गावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. तसेच ‘जय मल्हार’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सकाळी 10.30 वा. हे आंदोलन सुरू करण्यात आल्यानंतर दीड ते दोन तास आंदोलन करण्यात आले. 

यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही सर्व धनगर समाजाचे घटक असून आमच्या समाजास शिड्युल्ड कास्ट (एस. टी.) या प्रवर्गात आरक्षणात समाविष्ट करावे. तसेच आम्ही 347 तहसीलदारांना माहिती अधिकारात माहिती मागितली असता, त्यांनी उत्तरात धनगड समाजाला आजपर्यंत एस.टी. प्रवर्गाचा दाखला दिला नसून सदरची जातच अस्तित्त्वात नाही. त्यामुळे सरकारने ‘धनगड’ ही जमात नसून ‘धनगर’ समाजाला त्वरित आरक्षण देऊन अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी परिसरातील गावांचे अनेक लोक उपस्थित होते. यावेळी अण्णासाहेब बाचकर, कृष्णाजी होळकर, शेतकरी संघटनेचे विठ्ठल राऊत, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैशाली नान्नोर यांच्यासह अनेक नेत्यांनी मते मांडली.

आंदोलकांना संजय रांका यांनी केळी व पाणी देऊन सहकार्य केले. तर सरपंच गणेश हारदे व रामा पांढरे यांनी खिचडीचा प्रसाद दिला. येथील व्यापारी असोसिएशनने बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा दिला. या आंदोलनासाठी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरीक्षक एल.टी. भोसले यांच्यासह तीस पोलिस व सहा होमगार्ड तसेच महामार्गाचे पाच पोलीस, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी, जिल्हा पोलिस अधीक्षक गोपनीय पथकातील अजय खंडागळे, लोणीचे पोलिस उपनिरीक्षक रणजित गलांडे उपस्थित होते.

आ. भाऊसाहेब कांबळे यांनी धनगर समाजाच्या भावना तीव्र असून त्यांच्या प्रश्‍नांसाठी आपण त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी आ. कांबळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार अनिल दौंडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे, उपसरपंच अप्पासाहेब पारखे, संजय रांका, बाळासाहेब लाटे, सचिन लाटे, विलास लाटे, प्रकाश लाटे, नंदकिशोर पठारे, संभाजी नान्नोर, भाऊसाहेब पारखे, रामा पांढरे, जालिंदर काळे, विनोद चोखर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सर्जेराव लाटे यांनी केले. तहसीलदार अनिल दौंडे यांनी आंदोलकांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचविण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.