Fri, Apr 26, 2019 00:07होमपेज › Ahamadnagar › महसूल, पोलिस पथकावर हल्ला

महसूल, पोलिस पथकावर हल्ला

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMराहुरी : प्रतिनिधी

राहुरीत वाळूतस्करांची मुजोरी प्रचंड वाढली असून, काल मुळा पात्रात कारवाईसाठी गेलेल्या महसूल व पोलिस पथकावर वाळूतस्करांनी दगडाने हल्ला चढवत पकडलेल्या वाहनांसह 1 कोटींचा मुद्देमाल पळवून नेला. या हल्ल्यात तहसीलदार दौंडेंसह 2 तलाठी व 1 पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

राहुरी-पारनेरचा संगम असलेल्या चिखलठाण येथे मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार अनिल दौंडे यांना समजली होती. त्यानुसार दि. 9 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तहसीलदार दौंडे यांच्यासह तलाठी संजय आडोळे, पाडळकर, विकास शिंदे, काशिनाथ परते यांच्यासह बंदूकधारी पोलिस हवालदार बडे हे शेरी-चिखलठाण भागात कारवाईसाठी गेले होते. 

तहसीलदार दौंडे हे तलाठी आडोळे, पाडळकर व पोलिस बडे यांसह नदीपात्रात उतरले तर उर्वरीत कर्मचारी नदी पात्रालगत उभे केले. दरम्यान, महसूल पथक नदीपात्रात उतरताच अवैध वाळूतस्करी करणार्‍यांची भंबेरी उडाली. 3 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, 2 डंपर ही वाहने नदीपात्रात आढळून आली. तहसीलदार दौंडे आल्याचे पाहताच वाळूतस्करांनी धूम ठोकली. महसूल प्रशासन वाहने ताब्यात घेत असतानाच पळून गेलेल्या वाळू तस्करांनी 20 ते 25 जणांचा जमावाने पुन्हा नदीपात्रात येऊन महसूल पथकावर दगडाने हल्ला चढवला.

 यावेळी पोलिस हवालदार बडे यांनी पुढे येत हल्ला करू नका अन्यथा गोळी घालू असा इशारा दिला. त्याचवेळी वाळू तस्करांनी गलोरीने दगड व गोट्यांचा मारा करून हल्ला केला. हल्लेखोरांनी तहसीलदार दौंडे यांनाही दगडाने निशाण्यावर घेतले होते. हल्ल्यात पोलिस बडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी वाळू तस्करांनी पुढे येत बडे यांच्या ताब्यातील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. बंदूकही तोडली व वाळू तस्करांनी नदी पात्रातील पकडलेली सर्व वाहने वाळू तस्करांनी महसूलच्या ताब्यातून पळवून नेली. 

शेरी चिखलठाणचे तलाठी काशिनाथ परते यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी अल्ताफ शेख, जावेद शेख, पिरण सय्यद, अण्णा येसू काळनर, संजय डोलनर, अर्जुन पथवे, राजु मेंगाळ, प्रमोद गिर्‍हे, उत्तम जाधव यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल बडे यांच्या कपाळाला मार लागून 5 टाके पडले आहेत. तलाठी एस. के. आडोळे व तहसीलदारांना पाठीवर व पायावर मुक्का मार लागला आहे. 3 जेसीबी, 2 डंपर, 2 टॅक्टर व 10 ब्रास वाळू असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत नमुद आहे. 

पो. नि. अविनाश शिळीमकर यांनी घटनेची तात्काळ दखल घेत आरोपींच्या शोधासाठी 6 पथके तैनात केली आहेत. पारनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पथकही आरोपीच्या शोधात असून 3 आरोपी ताब्यात घेतले आहे. 

दरम्यान, दगडाचा मारा सुरू झाल्यानंतर पळत असताना तलाठी संजय आडोळे हे नदीपात्राच्या गाळ असलेल्या खड्ड्यात पडले. त्यावेळी तहसीलदार अनिल दौंडे यांनी गाडीतील टामीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढताच आडोळे यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.