Thu, Jan 24, 2019 06:38होमपेज › Ahamadnagar › सेवानिवृत्त अधिकारी, पत्नीविरुद्ध गुन्हा

सेवानिवृत्त अधिकारी, पत्नीविरुद्ध गुन्हा

Published On: May 23 2018 1:06AM | Last Updated: May 22 2018 11:22PMनगर : प्रतिनिधी

शासकीय सेवेत असताना अपसंपदा बाळगल्याप्रकरणी सेवानिवृत्त सहाय्यक कामगार आयुक्त गोरक्ष पांडुरंग आव्हाड व पत्नी मंगल गोरक्ष आव्हाड यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल चौकशी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर येथील कार्यालयाने आव्हाड दाम्पत्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आव्हाड यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यावरून पोलिस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने याप्रकरणी सखोल चौकशी केली. त्या चौकशीत आव्हाड दाम्पत्याकडे ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक 19 टक्के संपत्ती आढळून आली. मार्च 1989 ते ऑगस्ट 2010 या कालावधीत शासकीय सेवेत असताना गोरक्ष आव्हाड यांनी गैरमार्गाने 12 लाख 42 हजार 317 रुपयांची जास्त संपत्ती कमाविल्याचे या चौकशीत निदर्शनास आले. 

चौकशीत अपसंपदा कमाविल्याचे निदर्शनास येताच ‘एसीबी’ने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सेवानिवृत्त सहाय्यक कामगार आयुक्त गोरक्ष आव्हाड व त्यांची पत्नी मंगल आव्हाड या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 13 (1)(ई) सह 13 (2) व भारतीय दंड विधान कलम 109 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागच्या नगर येथील पथकाने ही कारवाई केली.