Mon, Apr 22, 2019 12:08होमपेज › Ahamadnagar › ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम 

ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम 

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:13PM

बुकमार्क करा
कौठा : वार्ताहर

चालू वर्षी मुबलक पाणी असूनही तालुक्यातील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. ढगाळ हवामानाचा ज्वारी, गहू, हरभरा, कांदा व अन्य पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत असल्याने यंदा पुन्हा शेतकर्‍यांवर संकट आले आहे. या हवामानांमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणत घट होणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. तालुक्याच्या कृषी विभागकडून मात्र या संदर्भात कोणतेही मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नेवासा तालुक्यात यावर्षी भरपूर पाणी असल्याने शेतकरी वेगवेगळ्या पिकांकडे वळला आहे. गहू, हरबरा, ज्वारी, कांदा व अन्य पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असताना या पिकांवर ढगाळ हवामानांचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. याच भागात शेतकर्‍यांनी कपाशीचे मोठे पिक केले होते परंतु दुर्दैवाने एक दोन वेचण्या झाल्यानंतर कपाशीवर किडींचा मोठा प्रमाणत प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पूर्णपणे वाया गेली. यात शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणत तोटा झाला. शासनाकडून  बोंडअळीच्या आर्थिक मदतीची घोषणा झाली परंतु कार्यवाहीला उशीर होत असल्याने शेतकर्‍यांच्या पदरात काय पडणार याविषयी तालुक्यात चर्चा होत आहे. 

तालुक्याच्या काही भागामध्ये ज्वारी हे पिक ठराविक गावामध्ये एक नंबर घेतले जात होते परंतु या वर्षीही ज्वारीचे दाणे भरण्याच्या काळात रोगराई आल्याने कणसे वाया गेले. पेरंणी झालेले बियाणे तयार होते की नाही अशी परिस्थिती रब्बी हंगामातील ज्वारीचे झाली आहे.

तालुक्याच्या कृषी विभाग मात्र शेतकर्‍यांवर पडणार्‍या या संकटाकडे फक्त बघ्याची भूमिका घेऊन काम करत आहे. या विभागाचा शेतकर्‍यांना फायदा होत नसल्याचे काही शेतकर्‍यांनी सांगितले. या हवामानांमुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शन व सल्ला शेतकर्‍यांना मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. या हवामानाचा फळबाग पिकांनाही फटका बसत असल्याने फळांचा नाश होत आहे.

ढगाळ हवामानामुळे रब्बी तसेच फळबागा धोक्यात आल्या आहेत. पिकांना लागणारे वातावरण तयार होत नसल्याने रब्बी पिके धोक्यात सापडली आहे. यामुळे उत्पादनात घट होत आहे तसेच फळबागांना या हवामानाचा चांगलाच फटका बसत आहे.