Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Ahamadnagar › मनपा निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर!

मनपा निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर!

Published On: Aug 25 2018 1:12AM | Last Updated: Aug 25 2018 1:12AMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या डिसेंबर महिन्यात होणार्‍या निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील 68 जागांसाठी शुक्रवारी (दि.24) आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी प्रारूप प्रभाग रचनेचे भाग नकाशेही मनपात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रारूप प्रभागरचना करतानाच अनुसूचित जाती व जमातीच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. 

निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार एकूण 68 जागांवर होणार्‍या निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग व जागा जाहीर करण्यात आल्या. सुमैय्या सिकंदर शेख, अभिमन्यू नारायण खडसे, सोमनाथ रमेश भिंगारदिवे, अक्षदा भिका गायकवाड या चार विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्‍चित करण्यात आले. यात अनुसूचित जातीसाठी 9 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 18, अशा एकूण 28 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातील अनुसूचित जातीच्या 5, नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 9 व अनुसूचित जमातीची 1, अशा 15 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. आरक्षणानंतर शिल्लक राहिलेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील 40 जागांपैकी 19 जागांवर महिला राखीव आरक्षण निश्‍चित करण्यात आले. तर 21 जागा सर्वसाधारण व्यक्‍ती प्रवर्गासाठी खुल्या राहिल्या आहेत. प्रत्येक प्रभागात किमान एक नागरिकांचा मागास प्रवर्ग व किमान 2 सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागा आहेत. प्रत्येक प्रभागात दोन जागा महिलांसाठी, अशा एकूण 34 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.

दरम्यान, आरक्षण सोडतीच्या वेळीच महापालिकेने प्रभागांच्या चतु:सिमा व व्याप्त भागाचा समावेश असलेले नकाशे नागरिकांसाठी खुले करण्यात आले. मनपाच्या आवारात त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचनेचा सविस्तर आराखडा 27 ऑगस्ट रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 सप्टेंबरपर्यंत त्यावर नागरिकांना हरकती घेता येणार आहेत. प्रभागाची रचना जाहीर झाल्यामुळे आता इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.

‘27 ऑगस्ट’ची उत्सुकता संपली!

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात 24 ऑगस्टला नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने या आरक्षण सोडतीवेळीच प्रभागांचे भाग नकाशेही नागरिकांच्या माहितीसाठी खुले केल्यामुळे 27 तारखेला होणार्‍या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रसिद्धीची उत्सुकता संपली आहे.