Thu, Aug 22, 2019 08:20होमपेज › Ahamadnagar › छिंदमप्रकरणी अहवाल मागवला!

छिंदमप्रकरणी अहवाल मागवला!

Published On: Jun 29 2018 12:10AM | Last Updated: Jun 28 2018 10:31PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी बडतर्फ झालेल्या उपमहापौर व भाजप नगरसेवक श्रीपाद छिंदम याने उपमहापौर पदाचा राजीनामा व महासभेच्या ठरावाबाबत नगरविकास खात्याकडे खुलासा सादर केल्यानंतर शासनाने या प्रकरणी मनपाकडून अहवाल मागविला आहे. मनपा आयुक्‍तांनी याबाबत सुस्पष्ट अभिप्राय द्यावा, असे निर्देशही मनपाला देण्यात आले आहेत.

आक्षेपार्ह वक्‍तव्यामुळे छिंदम विरोधात सर्वत्र संतापाची उसळल्यानंतर भाजापचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी त्याला पक्षातून बडतर्फ करत त्याचा राजीनामा घेतल्याचे जाहीर केले होते. त्याची प्रतही महापौर कार्यालयालाकडे सादर करण्यात आली होती. तसेच महासभेत या विषयी तीव्र पडसाद उमटले. छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव मंजूर करुन तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाने छिंदमला नोटीस बजावून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यावर खुलासा करतांना छिंदमने महापौरांवर गंभीर आरोप करत मी उपमहापौर पदाचा राजीनामाच दिलेला नसल्याचा दावा केला होता. तसेच माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नगरसेवक पद रद्द करण्याच्या ठरावालाही त्याने आक्षेप घेतला होता. मला देण्यात आलेली नोटीस रद्द करावी, असेही छिंदमने म्हटले होते. नगर विकास खात्याने या खुलासा पत्राची दखल घेत छिंदम याने केलेल्या खुलाशाबाबत महापालिकेकडून अहवाल मागविला आहे. मनपा आयुक्तांनी याबबातचा सुस्पष्ट अभिप्राय सादर करावा, असे निर्देश नगर विकास खात्याचे कक्ष अधिकारी सु.द.धोंडे यांनी मनपाला पाठविलेल्या पत्रात देण्यात आले आहेत.