होमपेज › Ahamadnagar › छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 1:19AMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणार्‍या श्रीपाद छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असा ठराव काल (दि.22) जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, छिंदमच्या वक्‍तव्यावरून भाजपा आणि शिवसेना सदस्यांमध्ये सभेत चांगलीच खडाजंगी झाली. भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी छिंदमसारख्या मूर्ख, नालायकास पक्षात कोणताही थारा नसल्याचे स्पष्ट करत, या ठरावास पाठिंबा दिला.

जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली काल विशेष सर्वसाधारण सभेस प्रारंभ झाला. सुनील गडाख यांनी छिंदम याच्या वक्‍तव्याबाबत त्याच्या निषेधाचा ठराव मांडला. त्यास सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर थोड्याच वेळात शिवसेनेचे सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर हे छिंदमच्या वक्‍तव्याच्या निषेधार्थ काळ्याफिती लावून सभागृहात आले. भाजपाचे विद्यमान आमदार व खासदारांनी छिंदमचा निषेध केलेला नाही. त्यांच्या निषेधाचाही ठराव करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी अकोले तालुक्यातील भाजपाने छिंदमचा निषेध केला आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे इस्त्राईलच्या दौर्‍यावर आहेत. भाजपामध्ये छिंदम सारख्या मूर्ख माणसांना थारा नाही, त्याची पक्षाने तात्काळ हकालपट्टी केली आहे. त्या नालायकावर आता बोलू नका, असे म्हणून निषेधाच्या ठरावाला पाठिंबा व्यक्‍त केला. 

अध्यक्षा विखे यांनी या विषयावर निषेधाचा ठराव झालेला आहे. आता विषय पत्रिकेवरील पुढील विषयांवर चर्चा करावी, अशी भूमिका स्पष्ट केली. मात्र, अनिल कराळे यांनी या सभागृहाचे आम्ही सदस्य असून, आम्हाला भावना व्यक्‍त करायच्या आहेत, असा आग्रह धरला. कराळेंना बोलण्याची संधी देताच त्यांनी भाजपच्या नेत्यांवर शरसंधान साधण्यास सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागणारी भाजप सत्तेवर आल्यावर त्यांना विसरली आहे. त्यांचे मस्तवाल उपमहापौर बेतालपणे बोलत आहेत. मुंबईमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाचे फलक काढून, पंतप्रधानांचे फलक लावले आहेत. महाराष्ट्रातील जनता हे कधीही विसरणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने चालणारी ही जनता आहे, असे ते म्हणाले.

त्यावर भाजप गटनेते वाकचौरे यांनी ही विशेष सभा भाजपाचा विरोध करण्यासाठी बोलविली आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर शिवसेना आणि भाजपा सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यावरून दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. वाकचौरे यांनी छिंदमची तात्काळ हकालपट्टी केली आहे. कराळे यांनी छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यास सर्वांनी एकमताने पाठिंबा देत तसा ठराव करण्यात आला. वाकचौरे यांनीही भाजपा सदस्यांच्या वतीने या ठरावास अनुमोदन दिले. त्यानंतर या विषयावर पडदा पडला.