Sun, Apr 21, 2019 14:31होमपेज › Ahamadnagar › अहवाल ‘लिक’ कुणी केला?

अहवाल ‘लिक’ कुणी केला?

Published On: May 27 2018 1:16AM | Last Updated: May 26 2018 11:03PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास ‘सीआयडी’कडे सोपविण्यात यावा, याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाने पोलिस महासंचाकांना अहवाल पाठविला होता. त्यात शिवसेनेचे पदाधिकारी राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. हा अहवाल जशाच्या तसा ‘लिक’ झाला होता. अहवाल ‘लिक’ करणार्‍याचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

पोलिसांनी पाठविलेल्या अहवालात म्हटले होते की, ‘शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड, त्यांचे पीए खेडकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर हे राजकीय स्वार्थासाठी पोलिसांवर दबाव आणून मयतांच्या नातेवाईकांना आंदोलनासाठी प्रोत्सादन देत आहेत. हा गुन्हा राजकीय स्वरुपाचा व गंभीर असल्याने केडगाव हत्याकांडाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात यावा.’ हा अहवाल तत्कालिन प्रभारी पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी पोलिस महासंचालकांना पाठविला होता. तो अहवाल जशाच्या तसा ‘लिक’ झाला होता.

अशा पद्धतीने अहवाल ‘लिक’ करणे कार्यालयीन गुपिते अधिनियम 1923 अन्वये गुन्हा आहे. कार्यालयीन अहवाल पूर्णपणे व्हायरल होणे, ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे अहवाल लिक करणार्‍याचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक शर्मा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावरून अहवाल ‘लिक’ करणार्‍यांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.