होमपेज › Ahamadnagar › व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरून काढल्याने खुनी हल्ला

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरून काढल्याने खुनी हल्ला

Published On: May 20 2018 1:40AM | Last Updated: May 20 2018 12:15AMनगर : प्रतिनिधी

व्हॉट्स अ‍ॅप गु्रपवरून काढल्याच्या रागातून युवकावर सशस्त्र खुनी हल्ला करण्यात आला. यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नगर-मनमाड रस्त्यावरील विळद शिवारातील विखे पाटील हॉस्पिटलसमोरील मेजवानी मेसवर गुरुवारी (दि. 17) रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी अमोल गडाख, सचिन गडाख (दोघे रा. सोनई, ता. नेवासा) व इतर दोन साथीदार अशा चौघांविरुद्ध संगनमताने खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत चैतन्य शिवाजी भोर (वय 18, रा. वळती, ता. आंबेगाव, जि. पुणे, हल्ली रा. माळकुप, ता. पारनेर) हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री भोर हे त्यांच्या मित्रांसमवेत मेजवानी मेसवर बसले होते. त्यावेळी सचिन गडाख याच्या सांगण्यावरून अमोल गडाख व त्याच्या दोन साथीदारांनी व्हॉट्स अप ग्रुपवरून काढल्याची विचारणा करून धक्काबुक्की व शिवीगाळ केली. अमोल गडाख याने धारदार हत्याराने भोर यांचे पोट, तोंड व पाठीवर सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी युवक चैतन्य भोर यांना तातडीने विखे पाटील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.