Sun, May 31, 2020 07:15होमपेज › Ahamadnagar › ‘अच्छे दिन’ची हवा डोक्यातून काढून टाका : आ. बच्चू कडू

‘अच्छे दिन’ची हवा डोक्यातून काढून टाका : आ. बच्चू कडू

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMपारनेर : प्रतिनिधी

केवळ भाषण करून देश चालणार नाही. लोकांच्या प्रश्‍नांचा विचार करून कृतिशिल कामे केली, तर देशाचे कल्याण होईल, असे सांगत आ. बच्चू कडू यांनी अच्छे दिनची हवा डोक्यातून काढून टाकण्याचे आवाहन केले. भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात आ. कडू बोलत होते. शेतकरी नेते अजित नवले अध्यक्षस्थानी होते. धनंजय धोरडे, संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, प्रवक्‍ते अनिल देठे, किरण वाबळे, रोहन आंधळे, असिफ शेख, अशोक आंधळे, सचिन सैद, संजय वाघमारे, शंकर नगरे, राहुल झावरे, दत्ता आवारी, मच्छिंद्र लंके, किरण डेरे आदी यावेळी उपस्थित होते. 

आ. कडू म्हणाले, घरात बसून घोषणा करायच्या, आंदोलने पुकारून जनतेला संकटात टाकायचे व व्होट बँकेला कुरवळायचे, असे धंदे आता चालणार नाहीत. मी महाराष्ट्राचा असे म्हणून राज्याचे भले होणार नाही, तर रस्त्यावर उतरून लोकांच्या कल्याणसाठी झटणारी संघटना हवी. भूमिपुत्र संघटना शेतकर्‍यांसाठी प्रामाणिक काम करील. जातीसाठी लोक रस्त्यावर उतरतात. हक्‍काच्या कार्यक्रमाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. 

शेतकर्‍यांनी स्वतःच हक्‍कासाठी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारीत वठणीवर आणले पाहिजे. आपल्या ताकदीच्या जोरावर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी सळो की पळो करू. दूध दरवाढीसाठी मंत्री महादेव जाणकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दुधाच्या भुकटीचे दर वाढविण्यात आले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला मात्र बगल देण्यात आली. आम्ही जानकारांकडे शेतकर्‍यांच्या मागण्या घेऊन पुन्हा जाणार आहोत. शेतकर्‍यांचा हक्‍क मिळाला नाही, तर त्यांचे कार्यालय फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे ते म्हणाले. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.